July 30, 2026

अमित शहा दौऱ्याला विरोध केला तर जशास तसे उत्तर देऊ – धीरज घाटे

पुणे, २९ जुलै २०२६ : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या १ ऑगस्ट रोजी होणाऱ्या पुणे दौऱ्यावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये संघर्षाची चिन्हे दिसू लागली आहेत. काँग्रेसने शहा यांच्या दौऱ्यावेळी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी काँग्रेसला कडक इशारा देत, “काँग्रेसच्या स्टंटबाजीला भारतीय जनता पक्ष जशास तसे उत्तर देईल. इलाका तुम्हारा होगा, लेकिन धमाका हमारा होगा,” असे म्हटले आहे.

लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारण्यासाठी अमित शहा आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल पुण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेऊन काँग्रेसला आंदोलनाची परवानगी देऊ नये, अशी मागणी केली.

घाटे म्हणाले, देशाची सुरक्षा मजबूत करणाऱ्या नेत्याच्या दौऱ्याला गालबोट लावण्यासाठी काँग्रेस आंदोलनाची स्टंटबाजी करत आहे. पुण्यात शांतता बिघडवण्याचा आणि वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

काँग्रेसला आंदोलनाची परवानगी दिल्यास भाजपलाही प्रति-आंदोलनाची परवानगी द्यावी लागेल. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला काँग्रेस जबाबदार असेल. पुण्यात वातावरण बिघडविण्याचा कोणताही प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही आणि त्याला भाजपकडून “जशास तसे” उत्तर दिले जाईल, असा इशाराही घाटे यांनी दिला.

यावेळी नगरसेवक रवी साळेगावकर, बापू मानकर, पुनीत जोशी, दीपक पोटे, विश्वास ननावरे, सुशील मेंगडे, अमर आवळे, महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा मनीषा लडकत, युवा मोर्चाचे अध्यक्ष दुष्यंत मोहोळ आदी उपस्थित होते.