July 30, 2026

काँग्रेस ने जर केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यात गडबड केली तर करारा जवाब मिलेगा -धीरज घाटे

पुणे, २९ जुलै २०२६ :-केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री आदरणीय अमितभाई शहा येत्या शनिवारी, १ ऑगस्ट २०२६ रोजी पुणे दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या या दौऱ्याला विरोध करण्यासाठी पुणे शहर काँग्रेसने पुकारलेले आंदोलनाचे नाटक अत्यंत केविलवाणे, द्वेषपूर्ण आणि हास्यास्पद आहे. ज्या भूमीत लोकमान्य टिळकांनी ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे’ अशी गर्जना केली, त्याच पुण्याच्या भूमीत ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अमितभाई शहा येत आहेत. लोकमान्य टिळकांनी आपल्या जहाल शब्दांतील अग्रलेखांनी इंग्रजांचे डोके ठिकाणावर आहे का, असा प्रश्न विचारला होता. तोच प्रश्न आता पुणे शहर काँग्रेसचे अर्धे अध्यक्ष प्रशांत जगताप यांना विचारण्याची वेळ आली आहे. प्रशांतराव, तुमचे डोके ठिकाणावर आहे का, तुम्ही कोणाच्या विरोधात आंदोलन करण्याची घोषणा करत आहात? असा सवाल त्यांनी काँग्रेस ला केला.

देशाचे गृहमंत्री अमितभाई शहा यांना विरोध करणे, हा पुण्याच्या सुसंस्कृत परंपरेचा आणि लोकमान्यांच्या विचारांचा अपमान आहे. विरोधासाठी विरोध करण्याची सवय जडलेल्या काँग्रेसने ही नौटंकी तात्काळ मागे घेतली पाहिजे, नाहीतर त्यांना त्यांच्याच पद्धतीने जशास तसे उत्तर दिले जाईल. अमितभाई शहांच्या सन्मानासाठी संपूर्ण पुणे शहर भारतीय जनता पार्टी त्याच सेव्हन लव्हज चौकात रस्त्यावर उतरेल आणि अर्धे अध्यक्ष असलेल्या प्रशांत जगताप यांची पळता भुई थोडी होईल, हे त्यांनी नीट लक्षात ठेवावे. असा इशारा शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी दिला

अमितभाई शहा हे देशाचे गृहमंत्री तर आहेतच, पण त्यासोबत ते अखंड आणि सुरक्षित भारताचे पोलादी शिल्पकारही आहेत. ज्या निर्णयांमुळे देशाची अखंडता भक्कम झाली, त्या प्रत्येक निर्णयामागे अमित शहा यांचे दूरदृष्टी नेतृत्व आहे. दशकांपासून भारताच्या छातीवर शल्य बनून राहिलेले ‘कलम ३७०’ क्षणाचाही विलंब न लावता इतिहासजमा करण्याचे ऐतिहासिक धाडस अमित शहा यांनीच दाखवले. आज जम्मू-काश्मीरमध्ये तिरंगा पूर्ण अभिमानाने फडकत आहे, याचे श्रेय गृहमंत्र्यांच्या पोलादी इच्छाशक्तीला जाते. विविध राज्यांतील डाव्या नक्षलवादाचा कणा मोडणे हे सुद्धा अमितभाई शहांमुळेच शक्य झाले आहे. तीन तलाकसारख्या कुप्रथेविरुद्ध कायदा करून मुस्लिम भगिनींना सन्मान मिळवून देण्याचे कामही त्यांनीच केले. अमितभाई शहा यांनी नेहमी ‘नेशन फर्स्ट’ या तत्त्वाला प्राधान्य दिले आहे. जुने ब्रिटिशकालीन जाचक कायदे रद्द करून ‘भारतीय न्याय संहिता’ लागू करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेऊन त्यांनी देशाच्या न्यायव्यवस्थेला आधुनिक आणि गतिमान बनवले आहे.

जे आज केवळ नौटंकीसाठी रस्त्यावर उतरून गळा काढत आहेत, त्यांनी जरा स्वतःच्या अपयशी भूतकाळात डोकावून पाहावे. अमितभाई शहा यांनी केवळ देशाची सुरक्षाच मजबूत केली नाही, तर देशातील तरुण आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याची भक्कम पायाभरणी केली आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (NEP) प्रभावी अंमलबजावणी करून शिक्षण व्यवस्थेत अमुलाग्र बदल घडवून आणले आहेत. स्टार्टअप्स, नवसंशोधन आणि क्रीडा क्षेत्राला दिलेल्या प्रोत्साहनामुळे आज देशातील युवा वर्ग जागतिक पटलावर भारताचे नाव उज्ज्वल करत आहे.

अमितभाई शहा यांना आधुनिक भारताचे ‘चाणक्य’ उगाच म्हटले जात नाही. भारतीय जनता पार्टीला जगातील सर्वात मोठा आणि प्रभावी राजकीय पक्ष म्हणून पुढे आणण्यात अमितभाई शहा यांच्या अफाट संघटन कौशल्याचा सिंहाचा वाटा आहे. उत्तर भारतापासून ते अगदी ईशान्य भारतातील प्रत्येक राज्यात भाजपाचा विजयाचा झेंडा फडकवून त्यांनी पक्षाला एका ऐतिहासिक शिखरावर नेऊन ठेवले आहे. ज्या काँग्रेस पक्षाला आज स्वतःचे अस्तित्व टिकवता येत नाही आणि ज्यांना जनतेने वारंवार नाकारले आहे, त्यांनी अमितभाई शहा यांच्या कर्तृत्वावर बोट दाखवणे म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा बाष्कळ प्रयत्न आहे.

पुणे ही हिंदवी स्वराज्चाचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, श्रीमंत बाजीराव पेशवे, महात्मा ज्योतिबा फुले आणि लोकमान्य टिळकांची कर्मभूमी आहे. देशहितासाठी अहोरात्र काम करणाऱ्या भारताच्या गृहमंत्र्यांचे स्वागत करणे हे प्रत्येक देशभक्त पुणेकराचे कर्तव्य आहे. विरोधकांनी कितीही आंदोलनांचा आव आणला किंवा कितीही गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, तरी पुणे शहर भारतीय जनता पार्टीकडून अमितभाई शहा यांचे अभूतपूर्व, भव्य आणि ऐतिहासिक स्वागत केले जाईल. राजकीय फायद्यासाठी पुण्याची शांतता आणि परंपरा बिघडवणाऱ्या काँग्रेसला पुण्यातील जनता योग्य वेळी त्यांची जागा नक्की दाखवून देईल! असे घाटे यांनी काँग्रेस चे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना सुनावले आहे