August 8, 2026

नक्षलवादाचा बिमोड करण्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारचे मोठे योगदान: विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील

पुणे, दि. 8 ऑगस्ट 2026: नक्षलवादाचा बिमोड करण्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयित प्रयत्नांचे मोठे योगदान राहिले आहे. सुरक्षा कारवायांसोबतच विकास, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य आणि जनकल्याणाच्या योजनांमुळे नक्षलग्रस्त भागातील परिस्थितीत मोठा बदल झाला आहे, असे मत नागपूर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी व्यक्त केले.

पुणे संवादतर्फे ‘नक्षलिझम : ए वॉर विदिन’ या परिसंवादाचे आयोजन एस. पी. कॉलेजच्या काकासाहेब चितळे सभागृहात करण्यात आले होते. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. नक्षलवादाचा प्रत्यक्ष सामना केलेले पोलीस अधिकारी कुमुद आत्राम, गंगा इम्पावर आणि गजानन धाडे यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार कार्तिक लोकांडे आणि सामाजिक कार्यकर्ते तुषार दामगुडे यांनी परिसंवादात सहभाग घेतला. निवृत्त कमोडोर श्रीकांत देशमुख आणि मनोज पोचट यांचीही उपस्थिती होती.

नक्षलवाद हा आदिवासी समाजाच्या विकासाला आणि संस्कृतीला लागलेला कॅन्सर असल्याचे पाटील यांनी सांगितले. नक्षलवादाचा सामना करताना केवळ सुरक्षा कारवायांवर भर न देता ‘विश्वास, निर्माण आणि जनकल्याण’ या तीन प्रमुख आधारांवर काम करण्यात आले. सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्याबरोबरच दुर्गम भागात सरकारची उपस्थिती वाढवणे, रस्ते, मोबाइल नेटवर्क, शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधा पोहोचवणे यामुळे या भागात सकारात्मक बदल घडून आला आहे.

नक्षलग्रस्त भागातील विकासासाठी रस्ते आणि डिजिटल कनेक्टिव्हिटीला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. २०१४ पासून नक्षलग्रस्त भागांमध्ये १२ हजार २४९ किलोमीटरहून अधिक रस्ते बांधण्यात आले असून, १७ हजार ३१९ किलोमीटरच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. तसेच ९ हजार ६०० हून अधिक मोबाइल टॉवर उभारण्यात आले असून, सर्वाधिक प्रभावित भागातील ९६ टक्के गावांना मोबाइल कनेक्टिव्हिटी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे शिक्षण, आरोग्य, बँकिंग आणि रोजगाराच्या संधी दुर्गम भागापर्यंत पोहोचण्यास मदत झाली आहे.

सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी नक्षलग्रस्त भागात ५९७ बळकटीकरण केलेली पोलीस ठाणी उभारण्यात आली असून, २०१४ मध्ये नक्षलवादी घटनांची नोंद करणाऱ्या ३३३ पोलीस ठाण्यांची संख्या आता १६ वर आली आहे. याशिवाय ४०८ नवीन CAPF सुरक्षा छावण्या उभारण्यात आल्या आहेत. CoBRA, CRPF, DRG आणि STF यांसारख्या विशेष दलांच्या समन्वयामुळे सुरक्षा कारवायांची क्षमता वाढली आहे. आधुनिक तंत्रज्ञान, ड्रोन, उपग्रह छायाचित्रे आणि डेटा विश्लेषणाचाही वापर करण्यात येत आहे.

केंद्र सरकारने २०१५ मध्ये नक्षलवादाविरोधात National Policy and Action Plan लागू करून सुरक्षा, संवाद आणि समन्वयावर आधारित व्यापक धोरण स्वीकारले. केंद्र आणि राज्य यंत्रणांमध्ये समन्वय वाढवण्याबरोबरच सामाजिक आणि आर्थिक समस्यांवरही लक्ष केंद्रित करण्यात आले.

नक्षलवादाचा सामना करताना आपले अनुभव सांगताना गंगा इम्पावर म्हणाले, “गडचिरोलीमधील मलकापूर हे माझे गाव. आमच्या गावात रस्ता व्हावा अशी माझ्या वडिलांची इच्छा होती. रस्त्याचे काम करणारी व्यक्ती ही माझ्या वडिलांची मित्र होती. या कारणावरून नक्षलवाद्यांनी माझ्या वडिलांना विरोध केला. त्यांना घरातून नेऊन त्यांची हत्या केली. त्यानंतर पुन्हा असे काही केले तर घरातील व्यक्तींनाही संपवू, अशा आशयाची चिठ्ठी त्यांच्या रक्ताने लिहून त्यांच्या मृतदेहावर ठेवली होती. हा प्रकार माझ्यासाठी अत्यंत हादरवून टाकणारा होता. मात्र, परिस्थितीसमोर न झुकता मी पोलीस दलात दाखल झालो आणि नक्षलवादाचा सामना केला. आज गडचिरोलीचे चित्र मोठ्या प्रमाणात बदलले आहे.”

गजानन धाडे यांनीही आपल्या अनुभवांना उजाळा दिला. “माझे वडील गावासाठी काम करत असताना एकदा नक्षलवादी घरी आले आणि त्यांनी एक लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर वडिलांना सोबत घेऊन गेले. हा अनुभव अत्यंत हादरवणारा होता. या घटनेनंतर आपणही पोलीस दलात भरती होण्याचा निर्णय घेतला,” असे त्यांनी सांगितले.

कुमुद आत्राम यांनी विधानसभा निवडणुकीच्या काळातील अनुभव तसेच नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत पायाला गोळी लागल्याचा प्रसंग सांगितला. प्रतिकूल परिस्थितीत काम करताना आलेल्या अनुभवांचे त्यांनी कथन केले. सुरक्षा दलांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे गडचिरोलीसह नक्षलग्रस्त भागाचा चेहरा बदलत असल्याचे त्यांनी नमूद केले.

नक्षलवादाविरोधातील लढ्याला पुनर्वसनाची जोड देण्यात आली. आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांना पुनर्वसन, आर्थिक मदत, कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या. २०२५ मध्ये २ हजार ३३७ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले, तर २०२४ ते मार्च २०२६ या कालावधीत ३ हजार ९२७ जणांनी शस्त्रे खाली ठेवली.

या सर्व प्रयत्नांचा परिणाम नक्षलवादी हिंसाचाराच्या आकडेवारीतही दिसून येतो. २०१४ मध्ये ८७० असलेल्या नक्षलवादी घटनांची संख्या २०२५ मध्ये २३४ वर आली, तर मृत्यूंची संख्या ३१० वरून १०० वर आली आहे.

सुरक्षा, विकास आणि जनकल्याण या तिन्ही आघाड्यांवर झालेल्या कामामुळे नक्षलग्रस्त भागातील नागरिकांचा शासनव्यवस्थेवरील विश्वास वाढला असून, दुर्गम भाग मुख्य प्रवाहाशी जोडण्यास मदत झाली आहे. सुरक्षेमुळे विकासाला जागा मिळाली, विकासामुळे विश्वास निर्माण झाला आणि विश्वासामुळे जनकल्याणाच्या योजना अधिक प्रभावीपणे पोहोचल्या, असे या परिसंवादातून अधोरेखित करण्यात आले.