August 8, 2026

सिंहगड रोडवरील वाहतूक कोंडीवर महापौर आक्रमक; पोलिसांना १५ दिवसांचा अल्टिमेटम

पुणे, ५ आॅगस्ट २०२६ : सिंहगड रस्त्यावरील दिवसेंदिवस गंभीर होत चाललेल्या वाहतूक कोंडीवर अखेर महापौर मंजूषा नागपुरे यांनी आक्रमक भूमिका घेत पोलिस प्रशासनाला थेट जाब विचारला. धायरी, नऱ्हे, नांदेड सिटी, वडगाव ते दांडेकर पुलापर्यंतच्या मुख्य रस्ते, पर्यायी मार्ग आणि चौकांचे अवघ्या १५ दिवसांत वाहतूक सर्वेक्षण करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी वाहतूक पोलिसांना दिले. अहवाल मिळताच महापालिकेकडून आवश्यक उपाययोजना आणि वाहतूक वॉर्डनची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयात झालेल्या बैठकीत महापौरांनी वाहतूक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली. “वाहतूक कोंडीच्या वेळी चौकात पोलीसच दिसत नाहीत. जे आहेत ते वाहतूक सुरळीत करण्याऐवजी दंड वसूल करण्यात व्यस्त असतात. मग नागरिकांच्या हालअपेष्टांना जबाबदार कोण?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.

बैठकीत नगरसेवकांनीही संताप व्यक्त करत उंबऱ्या गणपती चौकापासून दांडेकर पुलापर्यंत सकाळ-संध्याकाळ होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे विद्यार्थी, नोकरदार, रुग्ण आणि नागरिकांचे प्रचंड हाल होत असल्याचे निदर्शनास आणले. पोलीस बंदोबस्ताचा अभाव, विरुद्ध दिशेने धावणारी वाहने, अनधिकृत पार्किंग आणि वाढलेली अतिक्रमणे यामुळे परिस्थिती अधिकच बिकट होत असल्याचे त्यांनी सांगितले. वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली.

महापौरांनी तात्पुरत्या स्वरूपात मुख्य चौकांमध्ये वाहतूक पोलीस आणि वाहतूक वॉर्डनची संख्या वाढविण्याचे निर्देश दिले. तसेच अतिक्रमण, अनधिकृत पार्किंग, खड्डे, वाहतुकीला अडथळा ठरणारे बसथांबे, डीपी आणि ओव्हरहेड केबल्स यावर तातडीने कारवाई करण्यासाठी महापालिका आणि पोलिसांनी संयुक्त कृती आराखडा तयार करावा, असे आदेश दिले.

सण, उत्सव आणि मिरवणुकांना परवानगी देताना वाहतूक कोंडी व ध्वनीप्रदूषणाचा पुरेसा विचार केला जात नसल्याची टीकाही त्यांनी केली. या विषयावर सर्वपक्षीय शिष्टमंडळासह पोलीस आयुक्तांची भेट घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.

“सिंहगड रोडवरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिका आवश्यक ती सर्व मदत करेल. मात्र पोलिसांनी १५ दिवसांत वस्तुनिष्ठ सर्वेक्षण अहवाल सादर करावा. त्यानंतर कोणताही विलंब न करता उपाययोजना राबविल्या जातील,” असे महापौर मंजूषा नागपुरे यांनी स्पष्ट केले.