August 8, 2026

Pune: चिखलामुळे अपघात झाल्याने महापालिकेची बिर्ला बिल्डरला नोटीस

पुणे, ५ आॅगस्ट २०२६ : राजाबहादूर मील रस्त्यावर बांधकाम साहित्य वाहून नेणाऱ्या वाहनांमुळे रस्त्यावर चिखल पसरून अनेक दुचाकीस्वार घसरून जखमी झाल्याच्या घटनेची पुणे महापालिकेने दखल घेत संबंधित बांधकाम व्यावसायिकाला नोटीस बजावली आहे. बांधकाम साहित्य वाहून नेताना ते सार्वजनिक रस्त्यावर पडणार नाही, याची दक्षता घेण्याचे तसेच भविष्यात अशा प्रकारची घटना घडू नये, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश नोटिशीत देण्यात आले आहेत.

मंगळवारी सकाळी आरटीओ कार्यालय ते नायडू रुग्णालयादरम्यान रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल पसरल्याने अनेक दुचाकीस्वार घसरून पडले होते. या अपघातांत काही जण जखमी झाले. याच परिसरात अग्निशामक दलाचे केंद्र असल्याने जवानांनी तातडीने पाण्याचा मारा करून रस्ता स्वच्छ केला आणि पुढील अपघात टळले.

या घटनेनंतर शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर बांधकाम विकास विभागाने संबंधित विकासकाला नोटीस बजावली. नोटिशीनुसार, बांधकामासाठी लागणारे वाळू, खडी, सिमेंट, रेडीमिक्स काँक्रीट आदी साहित्य वाहतूक करताना ते सार्वजनिक रस्त्यावर पडत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे रस्ते खराब होत असून वारंवार अपघात घडत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. पुढील सात दिवसांत याबाबतचा खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच चालक, कंत्राटदार आणि संबंधित कर्मचाऱ्यांना स्पष्ट सूचना देऊन भविष्यात साहित्य रस्त्यावर पडणार नाही, याची खबरदारी घेण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. नियमांचे पालन न झाल्यास महापालिकेकडून पुढील योग्य ती कारवाई करण्यात येईल, असा इशारा नोटिशीत देण्यात आला आहे.