August 25, 2026

मराठीच्या ज्येष्ठ अभ्यासक प्रा. यास्मिन शेख यांचे निधन

पुणे, २४ आॅगस्ट २०२६ : मराठी भाषा, व्याकरण आणि भाषाविज्ञान क्षेत्रातील ज्येष्ठ अभ्यासक प्रा. यास्मिन शेख यांचे सोमवारी (दि. २४) सकाळी ९ वाजता निधन झाले. त्यांच्या निधनाने मराठी भाषा आणि व्याकरण क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. आपल्या प्रदीर्घ कार्यातून त्यांनी मराठी भाषेच्या अभ्यासाला आणि अध्यापनाला समृद्ध केले.

प्रा. शेख यांचे मराठी व्याकरण आणि भाषाविज्ञानाचे ज्ञान अत्यंत सखोल होते. व्याकरणातील क्लिष्ट संकल्पना त्या अत्यंत सोप्या आणि सहज भाषेत समजावून सांगत. देशभरातून व्याकरण क्षेत्रातील अनेक अभ्यासक, विद्यार्थी आणि जाणकार त्यांच्याकडे मार्गदर्शनासाठी येत. प्रत्येकाशी त्या अत्यंत आपुलकीने संवाद साधत आणि त्याच्या शंकांचे निरसन करत.

त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील नम्रता आणि ऋजुता विशेष उल्लेखनीय होती. व्याकरण क्षेत्रातील मोठे नाव असूनही त्यांना त्याचा कधीही अहंकार नव्हता. भेटायला आलेल्या व्यक्तीला आग्रहाने खाऊ घालणे, आपुलकीने संवाद साधणे आणि स्वतः दारापर्यंत सोडायला जाणे, हा त्यांच्या स्वभावाचा भाग होता.

लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकाशी त्यांची सहज नाळ जुळत असे. त्या अत्यंत कुटुंबवत्सल होत्या. नातू विराज याच्याशी त्यांचे विशेष जिव्हाळ्याचे नाते होते. तो त्यांच्या कुशीत शिरायचा आणि त्या त्याचे लाड करायच्या. भेटणाऱ्या व्यक्तीचा हात हातात घेऊन मायेने डोक्यावरून हात फिरवण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे अनेकांना आईच्या मायेची आठवण होत असे.

आयुष्याच्या उत्तरार्धातही त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन कायम होता. जवळच्या आप्तेष्टांच्या निधनाचे अनेक प्रसंग पाहूनही नकारात्मक विचारांना मनात स्थान न देता सतत कार्यरत राहण्याचा त्यांनी निर्धार केला होता. मराठी भाषा, तिचे व्याकरण आणि साहित्य यांची उपासना करीत राहणे, हाच त्यांच्या आयुष्याचा ध्यास होता. भा. रा. तांबे यांच्या ‘संध्याछाया भिवविती हृदया’ या ओळीचा संदर्भ देत, सकारात्मक दृष्टिकोनामुळे ‘संध्याछाया सुखविती हृदया’ असेही म्हणता येते, असे त्या सांगत.

मराठी ही आपली मातृभाषा असल्याचा अभिमानही त्या अत्यंत सहजपणे व्यक्त करत. ‘मुस्लीम असून तुम्ही इतके छान मराठी कसे बोलता?’ असा प्रश्न एका व्यक्तीने विचारला असता, ‘मराठी माझी मातृभाषा आहे. तुमच्यासारखंच मी बोलते. छान-बिन काही नाही,’ असे उत्तर त्यांनी दिले होते.

मुंबईतील एस.आय.ई.एस. महाविद्यालयात मराठीच्या प्राध्यापिका असताना त्यांच्या अध्यापनशैलीचा अनुभव अनेक विद्यार्थ्यांनी घेतला. सुरुवातीला मराठीचा वर्ग असल्याचे कळल्यावर काही विद्यार्थी वर्गाबाहेर पडत. मात्र, संत ज्ञानेश्वरांचे साहित्य त्या रसाळ आणि सहज भाषेत शिकवू लागल्यानंतर विद्यार्थ्यांचे हेच आश्चर्य कौतुकात बदलत असे.

प्रा. यास्मिन शेख यांच्या निधनाने त्यांचा मायाळू स्पर्श आणि मृदू संवाद कायमचा हरपला असला, तरी मराठी भाषा, व्याकरण आणि भाषाविज्ञान क्षेत्रातील त्यांचे योगदान पुढील अनेक पिढ्यांच्या स्मरणात राहणार आहे. मराठी भाषा आणि यास्मिन शेख हे अद्वैत त्यांच्या कार्यामुळे कायम राहणार आहे.