पुणे, २२ ऑगस्ट २०२६ : देशभक्तीपर गीतांचे सूर, हजारो मोबाइलच्या फ्लॅशलाईट्सचा लखलखाट आणि युवाशक्तीच्या एकसुरातील ‘वंदे मातरम्’चा जयघोष… अशा भारावलेल्या वातावरणात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा परिसर शुक्रवारी देशभक्तीच्या रंगात न्हाऊन निघाला. ‘वंदे मातरम् कृती समिती, पुणे’तर्फे आयोजित ‘यूथ की आवाज’ या विशेष सांगितिक कार्यक्रमाला तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ झालेल्या या कार्यक्रमात ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम् के सन्मान में, देश का युवा मैदान में’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. ‘जिंदगी मौत ना बन जाए’, ‘सुनो गौर से दुनियावालों’, ‘कोई कहे कहता रहे’, ‘जय हो’, ‘जय जय जय महाराष्ट्र माझा’, ‘शूर आम्ही सरदार’, ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ अशा देशभक्ती आणि महाराष्ट्राच्या अस्मितेला साद घालणाऱ्या गीतांनी वातावरण भारावून गेले. या कार्यक्रमात ‘वंदे मातरम्’च्या इतिहासाचेही स्मरण करण्यात आले. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या ‘आनंदमठ’ कादंबरीतून समोर आलेल्या या गीताला दीडशे वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यलढ्यातील त्याच्या योगदानावर प्रकाश टाकण्यात आला. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी १८९६ मध्ये काँग्रेसच्या अधिवेशनात हे गीत गायले आणि पुढे ते स्वातंत्र्यलढ्याचे प्रेरणागीत बनले.
कार्यक्रमाच्या अखेरीस मैदानावरील दिवे मंद करण्यात आले. हजारो मोबाइलचे फ्लॅशलाईट्स एकाच वेळी सुरू होताच विद्यापीठाच्या मैदानावर जणू नक्षत्रांचे आभाळच अवतरल्याचे चित्र निर्माण झाले. हातात मोबाइलची प्रकाशज्योत आणि ओठांवर ‘वंदे मातरम्’ घेऊन युवकांनी सामूहिक गायन केले. विकसित भारताच्या निर्मितीसाठी योगदान देण्याचा संकल्प करत या स्वरसंध्येची सांगता झाली.
….
पुण्यातील युवकांचे मी मनापासून अभिनंदन करतो. आज देशभक्त युवा संपूर्ण वंदे मातरम् म्हणणार आहेत. आपण संविधानाने दिलेल्या अधिकाराचा वापर करून वंदे मातरम् म्हणतो. मात्र, काँग्रेसमधील काही लोकांनी संपूर्ण वंदे मातरम् म्हणण्याला विरोध केला. त्यांनी देशाची, क्रांतिकारकांची आणि स्वातंत्र्यासाठी लढलेल्या थोर व्यक्तींची माफी मागितली पाहिजे. डसंविधानाचीही माफी मागितली पाहिजे. राष्ट्रभक्त युवक संपूर्ण वंदे मातरम् म्हटल्याशिवाय राहणार नाहीत. काँग्रेसला हे दाखवून देऊ. आपण देशाची ताकद आणि शक्ती आहात. आम्ही आपल्या सोबत आहोत – मुरलीधर मोहोळ, केंद्रीय नागरी वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री

More Stories
राहुल गांधींच्या कार्यक्रमापूर्वी सीओईपीमध्ये एबीव्हीपी-काँग्रेसमध्ये राडा
सूसमधील कचरा प्रकल्पाचे स्थलांतर नाहीच, प्रशासनाची भूमिका
Pune: वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर; पुढील ५० वर्षांचा विचार करून उपाययोजना कराव्यात – केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ