पुणे, २६ ऑगस्ट २०२६ : शहरासह महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या ३४ गावांमधील मोकाट व भटक्या जनावरांच्या संरक्षणासाठी आधुनिक गोशाळा, पशुवैद्यकीय रुग्णालय, चारा बँक, लसीकरण आणि पुनर्वसन केंद्र उभारण्याचा प्रस्ताव स्थायी समिती सदस्य सुहास टिंगरे यांनी मांडला होता. संबंधित विभागाचा सकारात्मक अभिप्राय मिळाल्यानंतर मुख्य सर्वसाधारण सभेने या प्रस्तावाला मंजुरी दिली.
मोकाट जनावरांमुळे होणारे अपघात आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर असतानाच जखमी जनावरांच्या उपचारासाठी महापालिकेची मदत वेळेत मिळत नसल्याची खंत टिंगरे यांनी व्यक्त केली. मृत जनावर उचलण्यासाठी तातडीने यंत्रणा उपलब्ध होते; मात्र जखमी जनावरांसाठी तातडीची वैद्यकीय मदत मिळत नाही, ही विसंगती दूर करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
जखमी आणि असहाय जनावरांना वेळेत उपचार मिळावेत तसेच त्यांना सुरक्षितपणे गोशाळेत स्थलांतरित करता यावे, यासाठी २४ तास अर्जंट पशुवैद्यकीय रुग्णवाहिका आणि आवश्यक वाहतूक व्यवस्था सुरू करण्याची मागणी त्यांनी केली.
जनावरांचे संरक्षण, उपचार आणि पुनर्वसन यासाठी महापालिकेने कायमस्वरूपी यंत्रणा उभारावी, अशी मागणी करताना टिंगरे यांनी जनावरांच्या तस्करीविरोधात काम करणाऱ्या गोरक्षकांवरील हल्ल्यांचाही मुद्दा उपस्थित केला. कायदा हातात न घेता अशा प्रकरणांत प्रशासनानेच तातडीने हस्तक्षेप करावा, यासाठी सक्षम यंत्रणा उभारणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
“प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. आता हा निर्णय केवळ कागदावर न राहता आधुनिक गोशाळा आणि २४ तास तातडीची पशुवैद्यकीय सेवा प्रत्यक्ष सुरू करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे,” असे टिंगरे यांनी स्पष्ट केले.

More Stories
पिंपळवंडीतील बालिका अत्याचार व हत्या प्रकरणी पीडित कुटुंबाची उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी घेतली भेट
गणेशोत्सवात ४ बेस, ४ टॉपच; प्लाझ्मा-प्रेशर मिडवर १०० टक्के बंदी- पोलिस आयुक्तांनी केले स्पष्ट
डीजे बंदीवरून गणेश मंडळांचा गोंधळ; सत्ताधारी, प्रशासनाची नमती भूमिका!