पुणे, २७ आॅगस्ट २०२६: गणेशोत्सवातील विसर्जन मिरवणुकीत ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी यंदा चार बेस आणि चार टॉप इतकीच ध्वनियंत्रणा वापरण्याबाबत गणेश मंडळांशी चर्चा सुरू आहे. यापेक्षा अधिक ध्वनियंत्रणा वापरली जाणार नाही, असे मंडळांनी पोलिसांना सांगितले आहे. मात्र, मोकळ्या जागेतील स्थिर कार्यक्रमांसाठी सहा बेस आणि सहा टॉप वापरण्याची मागणी काही मंडळांनी केली असून, त्यावरही चर्चा सुरू आहे.
पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सण-उत्सव साजरे करताना ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. प्लाझ्मा आणि प्रेशर मिड या ध्वनियंत्रणांमधून मोठ्या प्रमाणात डेसिबल निर्माण होत असल्याचे पोलिसांच्या चाचणीत निदर्शनास आले आहे. त्यामुळे प्लाझ्मा आणि प्रेशर मिडवर शंभर टक्के बंदी राहणार आहे. लेसरच्या वापराबाबतही मंडळांशी चर्चा झाली आहे.
काल झालेल्या मिरवणुकीदरम्यान सहा ठिकाणी प्लाझ्मा आणि प्रेशर मिडचा वापर आढळून आला. त्यामुळे संबंधितांची संपूर्ण ध्वनियंत्रणा जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी काल एक हजारपेक्षा अधिक ठिकाणी ध्वनिक्षमतेच्या चाचण्या घेतल्या. त्यापैकी १४८ ठिकाणी निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक डेसिबल आढळल्याने संबंधितांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
ढोल-ताशा पथकांच्या सरावाबाबतही पोलिसांकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहेत. विसर्जन मिरवणुकीत किती ढोल-ताशा पथकांना परवानगी द्यायची, याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. लक्ष्मी रोडवरून मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या सुमारे १८० ते १९० गणेश मंडळांशी पोलिसांची चर्चा सुरू आहे.
लक्ष्मी रोड आणि टिळक रोडवरील गर्दी नियंत्रणासोबतच गणेश मंडळांना मिरवणुकीत अडथळा न येता पुढे जाता यावे, यासाठी नियोजन केले जात आहे. ध्वनियंत्रणेबाबतचा अंतिम निर्णय सर्व संबंधितांशी चर्चा केल्यानंतरच घेतला जाईल. कोणतीही व्यक्ती, व्यापारी किंवा अन्य घटक पोलिसांना निर्णयासाठी दिशा देऊ शकणार नाही, असे कुमार यांनी स्पष्ट केले.

More Stories
खेड-शिवापूर परिसरात दुर्मिळ खवले मांजराचे रेस्क्यू; सुरक्षित वनपरिक्षेत्रात मुक्तता
पुण्यात हजारो MPSC स्पर्धकांचा विद्यार्थी आक्रोश मोर्चा; कथित गैरप्रकारांवर कारवाईची मागणी
तुकाराम ओंबाळे यांचे कार्य आपल्या सर्वांसाठी प्रेरक: पोलीस आयुक्त अमितेश कुमार