पुणे, 13/9/2026: देशविघातक कारवायांसाठी दहशतवादी संघटना आणि त्यांचे हस्तक आधुनिक काळात बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. विशेषतः आर्थिक गुन्हे, सायबर गुन्हेगारीचे प्रमाण वेगाने वाढत आहे. कल्पनातीत प्रमाणात या गुन्हेगारीत आर्थिक स्रोत गैरमार्गाने वापरले जात आहेत. या पार्श्वभूमीवर देशाच्या तपास यंत्रणा, सुरक्षा आस्थापना, पोलिस, अन्वेषण संस्था यांच्या सोबतीने प्रत्येक नागरिकाचीही जबाबदारी वाढली आहे. आर्थिक गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवणे हे आता यंत्रणा आणि नागरीक यांचे संयुक्त उत्तरदायित्व आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी शनिवारी येथे केले.
प्रसिद्ध लेखक हेमंत गोडसे लिखित ‘चित्तथरारक’ या आर्थिक गुन्हेगारी, टेरर फंडिंगसाठी त्याचा वापर आणि तपास, अशा सूत्राभोवती फिरणाऱ्या कादंबरीच्या प्रकाशन समारंभात प्रवीण दीक्षित बोलत होते. राजहंस प्रकाशनाचे संचालक – संपादक डॉ. सदानंद बोरसे, लेखक हेमंत गोडसे तसेच अरुंधती दीक्षित व्यासपीठावर होते. प्रसिद्ध लेखिका शोभा बोंद्रे तसेच शिरीष देशपांडे हेही प्रेक्षागृहात उपस्थित होते.
आर्थिक गुन्हेगारी करणारे दहशतवादी व त्यांचे हस्तक म्हणजे साक्षर असुर आहेत, असे सांगून प्रवीण दीक्षित म्हणाले, हेमंत गोडसे यांनी अगदी वेगळ्या पण ऐरणीवरील विषय कादंबरीसाठी निवडला आहे. हा विषय अतिशय आव्हानात्मक आहे. रहस्य कायम ठेवत वाचकांना शेवटपर्यंत गुंतवून ठेवण्याची किमया त्यांनी साधली आहे. विशेषतः आर्थिक व सायबर गुन्हेगारीचा जागतिक दहशतवादाशी काय आणि कसा संबंध असू शकतो, याविषय़ी त्यांनी सखोल अभ्यास व संशोधन केले आहे. गोडसे यांची ही कादंबरी नावाप्रमाणेच चित्तथरारक आहे आणि मराठी साहित्यात ती महत्त्वाची ठरेल.
दीक्षित पुढे म्हणाले, ३७० ए हे कलम रद्द केल्यानंतर परिस्थितीत फरक पडला आहे, पण तरीही धोका कायम आहेच. अशा परिस्थितीत आर्थिक आणि सायबर गुन्हेगारीच्या माध्यमातून दहशतवादी गटांना, हस्तकांना आर्थिक बळ पुरवले जात असल्याचे अनेक घटनांच्या तपासांतून पुढे आले आहे. नव्या तंत्रज्ञानाचा हे गट गैरवापर करून देशात व समाजात अस्थिरता निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहेत. अशा परिस्थितीत प्रत्येक नागरिकाने सजग असणे आणि पोलिसमित्र होणे आवश्यक आहे.
लेखक हेमंत गोडसे म्हणाले, माझ्या व्यावसायिक ज्ञानाचा व अनुभवाचा या कादंबरीलेखनासाठी मोठा उपयोग झाला. रहस्य टिकवून ठेवण्याची जबाबदारी आव्हानात्मक होती. किमान ३ वर्षे मी या लेखनासाठी विविध प्रकारच्या संशोधनाला दिली. विदेशी लेखक असे संशोधन सातत्याने आणि वर्षानुवर्षे करतात. त्यांचे संशोधन ही माझीही प्रेरणा ठरली. तसेच व्यक्तिरेखांचे बदलते नातेसंबंध कथानकाला कसे कलाटणी देणारे ठरू शकतात आणि तपासयंत्रणा कसे काम करतात, याची माहिती वाचकांना कादंबरीच्या पूर्ण वाचनाला प्रेरित करेल.
डॉ. बोरसे म्हणाले, या कादंबरीच्या पानापानांतून आणि ओळींओळींतून लेखकाचा व्यासंग आणि अभ्यास तसेच प्रतिभा आणि बुद्धीमत्ता, यांचा प्रत्यय वाचकांना येतो. कादंबरीचा पट अतिशय विस्तीर्ण आणि गुंतागुंतीचा आहे. हे लेखन म्हणजे विविध क्षेत्रांतील माहितीचा खजिना आहे. क्राईम थ्रिलरपेक्षाही वेगळी वाट निवडणारी आणि वेगळ्याच वाटेने चालणारी ही कादंबरी विश्लेषणाच्या माध्यमातून रहस्य उलगडत नेणारी आहे. केतकी गोवंडे यांनी सूत्रसंचालन केले.

More Stories
नृत्यपरंपरेला वर्षभराचा आधार; ‘एनसीपीए डान्स गुरुकुल’ उपक्रमांतर्गत देशभरातील १२ गुरुकुलांना पाठबळ
प्रभाग क्र. ८ व ९ मधील सर्व गणेश विसर्जन घाटांच्या तयारीचा उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी घेतला आढावा
‘एआय युगात आजीवन विद्यार्थी राहा, ज्ञान प्रयोगशाळेतून बाहेर पडून समाजात उतरावे’: जिष्णु देव वर्मा