पुणे, १३ सप्टेंबर २०२६ : भारतीय शास्त्रीय नृत्यपरंपरेतील गुरु-शिष्य परंपरेला बळ देण्याचे स्वप्न आता देशभरातील १२ गुरुकुलांपर्यंत पोहोचले असून, या माध्यमातून वर्षभर नृत्यक्षेत्राला सातत्यपूर्ण आधार मिळत आहे. कला आणि संस्कृतीचे समाजातील महत्त्व अधोरेखित करत कॉर्पोरेट क्षेत्रानेही या परंपरेच्या संवर्धनासाठी पुढाकार घेणे ही सकारात्मक बाब आहे, असे ‘एनसीपीए’च्या नृत्य विभागाच्या प्रमुख स्वप्नकल्पा दासगुप्ता यांनी सांगितले.
नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स आणि बँक ऑफ अमेरिका यांच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या ‘डान्स गुरुकुल’ उपक्रमाची व्याप्ती आता देशभरातील १२ गुरुकुलांपर्यंत पोहोचली आहे. या उपक्रमाला पुण्यातील नादरूप कथक संस्थेचे सहकार्य लाभले असून, ज्येष्ठ कथकगुरू व नादरूपच्या संस्थापक पंडिता शमा भाटे यांच्या मार्गदर्शनातूनही या उपक्रमाला महत्त्वपूर्ण योगदान मिळत आहे.
“गुरु, शिष्य आणि सहृदय प्रेक्षक हे भारतीय नृत्यपरंपरेचे एक सुंदर वर्तुळ आहे. कलाकारांना प्रोत्साहन आणि आशीर्वाद देणारा सहृदय समाज तितकाच आवश्यक आहे,” असे स्वप्नकल्पा यांनी नमूद केले.
याच उपक्रमाचा भाग म्हणून पुण्यात नादरूप कथक संस्थेच्या सहकार्याने ‘एनसीपीए डान्स गुरुकुल’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रसिद्ध नृत्यगुरू प्रीती पटेल यांच्या शिष्यांनी ‘प्रिये चारुशीले’ ही मणिपुरी नृत्यरचना सादर केली. जयदेवांच्या ‘गीतगोविंद’वर आधारित या सादरीकरणातून राधा-कृष्णाचे प्रेम, विरह आणि भक्तीचे भावविश्व मांडण्यात आले. मणिपुरी नृत्याची लयबद्धता, नजाकत आणि भावाभिनय यामुळे सादरीकरणाला विशेष रंगत आली.
यानंतर नादरूपच्या प्रमोद वाघ, श्रद्धा मुखेडे, नयन कोहळे आणि श्रेया कुलकर्णी यांनी ‘त्रिमिती’ ही कथक रचना सादर केली. गणेश वंदना, शिव परण आणि आमद यांसह ‘कालियामर्दन’मधून कृष्णाने कालियावर मिळविलेला विजय, तसेच ठुमरी आणि तराण्याच्या माध्यमातून कथकचे विविध भाव व लयकारी सादर करण्यात आली.
यावेळी पंडिता शमा भाटे यांच्या हस्ते स्वप्नकल्पा दासगुप्ता यांचा भारतीय शास्त्रीय नृत्याच्या संवर्धनातील योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला.
‘एनसीपीए डान्स गुरुकुल’ उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना पारंपरिक नृत्यप्रशिक्षणाबरोबरच सादरीकरण, प्रकाशयोजना, ध्वनी, कलाकारांचे दस्तऐवजीकरण आणि अनुदानासाठी अर्ज अशा व्यावसायिक कौशल्यांचीही ओळख करून दिली जाते. पुढील काळात ओडिशा, दिल्ली, बंगळुरू आणि कोलकाता यांसह देशातील विविध केंद्रांमध्ये या उपक्रमाचा विस्तार होणार आहे.

More Stories
आर्थिक गुन्हेगारीवर नियंत्रण हे तपास यंत्रणा आणि सजग नागरिकांचे संयुक्त उत्तरदायित्व: माजी पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित
प्रभाग क्र. ८ व ९ मधील सर्व गणेश विसर्जन घाटांच्या तयारीचा उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी घेतला आढावा
‘एआय युगात आजीवन विद्यार्थी राहा, ज्ञान प्रयोगशाळेतून बाहेर पडून समाजात उतरावे’: जिष्णु देव वर्मा