September 14, 2026

‘एआय युगात आजीवन विद्यार्थी राहा, ज्ञान प्रयोगशाळेतून बाहेर पडून समाजात उतरावे’: जिष्णु देव वर्मा

पुणे, ११ सप्टेंबर २०२६ : कृत्रिम बुद्धिमत्ता, ऑटोमेशन आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या वेगवान बदलांच्या युगात केवळ पदवी मिळवणे पुरेसे नसून विद्यार्थ्यांनी ‘आजीवन विद्यार्थी’ राहून सातत्याने नवी कौशल्ये आत्मसात करावीत. ‘दीक्षांत म्हणजे शिक्षणाचा अंत नव्हे’, तर ज्ञानासोबत सामाजिक जबाबदारी स्वीकारण्याचा हा महत्त्वाचा टप्पा आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल तथा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलपती जिष्णु देव वर्मा यांनी केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या १२७ व्या पदवीप्रदान समारंभात अध्यक्षीय दीक्षांत भाषण करताना ते बोलत होते. या वेळी राज्यपालांचे सचिव आयएएस डॉ. प्रशांत नारनवरे, कुलगुरू प्रा. (डॉ.) सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर , प्रभारी कुलसचिव प्रा. डॉ. प्रफुल्ल पवार, वित्त व लेखाधिकारी सीएमए डॉ. चारुशीला गायके, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. राजेंद्र तलवारे, विद्यापीठाच्या सल्लागार समितीचे, व्यवस्थापन परिषदेचे, विद्या परिषदेचे व अधिसभेचे सन्माननीय सदस्य, शिक्षक, शिक्षकेतर सेवक, पदवीधारक विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

राज्यपाल म्हणाले की, बदलत्या तंत्रज्ञानाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठांनी उद्योगविश्वाशी समन्वय वाढवून विद्यार्थ्यांना इंटर्नशिप, संशोधन, प्रात्यक्षिक शिक्षण आणि उद्योजकतेच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात. विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत; मात्र त्यासाठी कठोर परिश्रम, शिस्त आणि कृतीची जोड द्यावी. सक्षम होताना संवेदनशील, महत्त्वाकांक्षी होताना जबाबदार आणि नाविन्यपूर्ण विचार करताना नैतिक मूल्यांशी बांधील राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत शिक्षणाचा उपयोग सामाजिक परिवर्तनासाठी झाला पाहिजे, असे सांगत राज्यपालांनी क्रीडा, शारीरिक आरोग्य, नशामुक्त परिसर आणि सामाजिक बांधिलकी यांनाही शिक्षणाचा अविभाज्य भाग मानण्याचे आवाहन केले. ‘विकसित भारत २०४७’च्या निर्मितीत युवा पिढीची भूमिका निर्णायक असून त्यासाठी विद्यापीठांनी परवडणारे आणि उत्कृष्ट शिक्षण – ‘Affordability and Excellence’ हे प्रमुख सूत्र ठेवावे, असे त्यांनी सांगितले.

ज्ञान समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावे
कुलगुरू प्रा. (डॉ.) सुरेश गोसावी यांनी वार्षिक अहवाल सादर करताना विद्यापीठाच्या आगामी वाटचालीची दिशा स्पष्ट केली. “ज्ञान केवळ प्रयोगशाळेत किंवा कागदावर मर्यादित राहता कामा नये; ते शेतात, गावात, उद्योगात आणि रुग्णालयात पोहोचून समाजाच्या समस्या सोडवणारे असावे,” असे त्यांनी सांगितले.

विद्यापीठाची वाटचाल ‘समर्पक/लोकाभिमुख तंत्रज्ञान’ (Appropriate Technology) आणि ‘ज्ञाननिर्मिती’ या दोन प्रमुख स्तंभांवर सुरू असून समाजातील शेवटच्या घटकाला परवडणारे, स्वस्त, टिकाऊ आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे हे संशोधनाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे कुलगुरूंनी स्पष्ट केले.

आजच्या या १२७ व्या पदवीप्रदान सोहळ्यामध्ये एकूण ६ सुवर्णपदके, १,०७,३५७ पदवी प्रमाणपत्रे, ४४६ पीएच.डी. पदव्या, २ एम.फिल. प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. विद्यापीठाशी ८५९ महाविद्यालये संलग्न असून ७.५ लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

दोहा येथील MIE-SPPU ऑफश्योर कॅम्पसच्या यशानंतर दुबई येथे दुसरे आंतरराष्ट्रीय ऑफश्योर कॅम्पस सुरू करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असल्याची माहिती कुलगुरूंनी दिली. तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी यंदापासून १० लाख रुपयांच्या निधीतून ‘कुलपती पदक’ (Chancellor’s Medal) सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

मधुमेही रुग्णांच्या जखमा लवकर भरून येण्यासाठी विकसित केलेली PROHEAL ही स्वस्त प्रोबायोटिक-आधारित ड्रेसिंग प्रणाली, ICMR व NIV च्या सहकार्याने सुरू करण्यात आलेला M.Sc. Virology अभ्यासक्रम, डिजिटल परीक्षा व On-Screen Evaluation यांसारख्या उपक्रमांमुळे विद्यापीठाचे संशोधन, शिक्षण आणि तंत्रज्ञान समाजाभिमुख होत असल्याचेही कुलगुरूंनी नमूद केले.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०ची प्रभावी अंमलबजावणी, कौशल्याधारित व रोजगाराभिमुख शिक्षण आणि समाजोपयोगी संशोधनाच्या माध्यमातून ‘विकसित महाराष्ट्र’ व ‘विकसित भारत’ घडविण्यासाठी सक्षम युवा पिढी घडविण्याचा विद्यापीठाचा संकल्प असल्याचे कुलगुरूंनी स्पष्ट केले. विद्यापीठाच्या या दीक्षांत सोहळ्याचे नेटके सूत्रसंचालन विद्यावाणीचे संचालक श्रीदत्त गायकवाड यांनी केले.