September 15, 2026

पुणे : अधिकाऱ्यांनो, कार्यालयात न बसता बाहेर फिरा; महापालिका आयुक्तांचे आदेश

पुणे, १४ सप्टेंबर २०२६ : सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या सहाय्यक आयुक्तांनी आणि कनिष्ठ अभियंत्यांनी प्रत्येक कामकाजाच्या दिवशी पूर्वार्धात क्षेत्रीय पाहणीसाठी उपस्थित राहावे, असे आदेश महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी काढले आहेत.

पाहणीदरम्यान रस्ते, नाले, मलनिस्सारण, स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा, अतिक्रमणे, सार्वजनिक आरोग्य यांसह विविध अडचणी व त्रुटींची नोंद घ्यावी. त्यांची पूर्तता विहित कालमर्यादेत करण्याची दक्षता घ्यावी. यासाठी सर्व विभागांनी एकमेकांशी समन्वय ठेवावा, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

क्षेत्रीय स्तरावर निराकरण होऊ शकणाऱ्या कामांचे तत्काळ निराकरण करावे. मुख्यालय स्तरावर मंजुरी, संसाधने, आवश्यक प्रशासकीय मान्यता इत्यादी बाबी तत्काळ संपूर्ण तपशीलासह संबंधित विभागप्रमुखांना कळवाव्यात.

प्रत्येक अडचणीची आणि त्यावर करण्यात आलेल्या कार्यवाहीची छायाचित्रे किंवा व्हिडिओ ‘पूर्वीचे व नंतरचे’ अशा स्वरूपात काढून ते पुराव्यासाठी जतन करणे संबंधित अधिकाऱ्यांवर बंधनकारक राहील.

प्रत्येक आठवड्यातील सर्व निरीक्षणे व करण्यात आलेली कार्यवाही, तसेच विभागप्रमुखांकडे सादर केलेल्या बाबी आणि त्यांची सद्यस्थिती यांचा क्षेत्रीय व परिमंडळनिहाय एकत्रित अहवाल दर शुक्रवारी महापालिका आयुक्त आणि संबंधित अतिरिक्त आयुक्तांकडे पाठवणे बंधनकारक राहील. यासाठी स्वतंत्र ‘गुगल शीट’ दर आठवड्याला भरणे आवश्यक असेल.

नागरी समस्यांसंदर्भात महापालिका आयुक्त दर सोमवारी सकाळी बैठक घेतील. या बैठकीला सर्व परिमंडळ उपायुक्त, सहाय्यक आयुक्त आणि कनिष्ठ अभियंत्यांनी उपस्थित राहणे बंधनकारक राहील.

या आदेशांचे पालन न केल्यास त्याची गंभीर दखल घेऊन संबंधितांवर कारवाई केली जाईल.