September 15, 2026

पुणे गणेशोत्सव २०२६ : दीड दिवसाच्या गणपती विसर्जनासाठी महापालिका सज्ज

पुणे, १५ सप्टेंबर २०२६ : दीड दिवसाच्या गणपती मूर्तींच्या विसर्जनासाठी पुणे महापालिका सज्ज झाली आहे. शहरातील विविध विसर्जनस्थळी कृत्रिम विसर्जन हौद, लोखंडी टाक्या, निर्माल्य संकलन केंद्रे आणि जीवरक्षकांची व्यवस्था करण्यात आली आहे.

विसर्जनासाठी नदीपात्र आणि विविध ठिकाणी मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून शहरातील १५ प्रमुख घाटांवर २४ तास सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनी नैसर्गिक जलस्रोतांमध्ये गणेशमूर्तींचे विसर्जन न करता महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या कृत्रिम हौदांचा वापर करावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

महापालिकेच्या नियोजनानुसार, शहरात ३७ बांधलेले विसर्जन हौद असून, त्यापैकी ३५ ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय ३८ ठिकाणी ६९ अतिरिक्त कृत्रिम हौद उभारण्यात आले आहेत. तसेच २८१ ठिकाणी ६४८ लोखंडी टाक्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

निर्माल्य संकलनासाठी २७४ ठिकाणी ३२८ केंद्रे उभारण्यात आली आहेत. याशिवाय मूर्ती संकलन आणि दान केंद्रांचीही व्यवस्था करण्यात आली असून, अशी केंद्रे २४१ ठिकाणी उपलब्ध असतील.

अमृतेश्वर, पुलाची वाडी, नटराज सिनेमा, ओंकारेश्वर, वृद्धेश्वर, गरवारे कॉलेज, पांचाळेश्वर, अष्टभुजा मंदिर, संगम, विठ्ठल मंदिर, बाप्पू घाट, ठोसर पागा, चिमा उद्यान, येरवडा, दत्तवाडी आणि वारजे स्मशानभूमी घाट या प्रमुख ठिकाणी सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.

घाटांवर अग्निशमन दलाच्या जवानांसोबत जीवरक्षक तैनात करण्यात येणार आहेत. ९० जीवरक्षक तीन पाळ्यांमध्ये कार्यरत राहतील, तर ३० जीवरक्षक मध्यवर्ती अग्निशमन केंद्रात राखीव ठेवण्यात येणार आहेत. विसर्जनस्थळी अतिरिक्त दोरखंड आणि लाइफ जॅकेटचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

विसर्जनादरम्यान निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने क्षेत्रीय कार्यालयनिहाय नियोजन केले आहे. आवश्यकतेनुसार फिरती स्वच्छतागृहेही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

महापालिकेने चार तलाव, सात विहिरी आणि ४१ कालव्यांच्या ठिकाणीही विसर्जनाची व्यवस्था केली आहे. गणेशोत्सवादरम्यान विविध विसर्जनाच्या दिवशी वाढणारी गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाने ही व्यवस्था केली आहे.

नागरिकांनी महापालिका प्रशासनाला सहकार्य करावे, निर्धारित विसर्जनस्थळांचा वापर करावा आणि सुरक्षा नियमांचे पालन करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे. पर्यावरणपूरक विसर्जनाला प्राधान्य देऊन नैसर्गिक जलस्रोतांचे संरक्षण करण्याचे आवाहनही प्रशासनाने केले आहे.