December 7, 2025

पुणे: शाळेतील प्रवेशावरून दाम्पत्यात वाद; महिलेने पतीला पेटवून दिले

येरवडा, २७/०७/२०२३: मुलीच्या प्रवेशावरुन वाद झाल्याने महिलेने पतीच्या अंगावर राॅकेल ओतून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना येरवडा भागात मंगळवारी रात्री घडली. या घटनेत पती गंभीर भाजला असून पत्नीसह नातेवाईकांविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुकेश सुरेश रजपूत (वय ४२, रा. येरवडा) असे गंभीर भाजलेल्या पतीचे नाव आहे. त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पत्नी उज्वला दत्तात्रय कांबळे (वय ४४) हिला अटक करण्यात आली असून तिच्या नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उज्वला मुकेशची दुसरी पत्नी आहे. दोघांना पाच वर्षांची मुलगी आहे. शाळेच्या प्रवेशावरुन दोघांमध्ये मंगळवारी रात्री वाद झाला.

उज्वलाने पतीच्या अंगावर राॅकेल ओतून पेटवून दिले. गंभीर जखमी झालेल्या मुकेश यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पत्नीसह एका नातेवाईकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.