May 20, 2024

पुणे: दहशतवाद्यांना आश्रय देणे भोवले, एकाला अटक

पुणे, दि. २७/०७/२०२३: दहशतवाद्यांना आश्रय देण्यासाठी मदत करणार्‍याला एटीएसने अटक केली आहे. त्याच्याकडे सखोल तपास सुरु आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी संबंधित घरमालकाची जुजबी विचारपूस केली. त्याच्याविरूद्ध कोणतीही कारवाई न केल्यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

कदीर पठाण (रा. कोंढवा ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. मोहम्मद युनूस मोहम्मद याकू साकी (वय -२४), मोहम्मद इम्रान मोहम्मद युसूफ खान (वय-२३, दोघे सध्या रा. चेतना गार्डन, मीठानगर, कोंढवा- रा. रतलाम, मध्यप्रदेश) अशी अटक केलेल्या दहशवाद्यांची नावे आहेत. मोहम्मद शहनवाज आलम (वय ३१) फरार झाला आहे.

दहशतवादी मोहमद साकी आणि खान हे एन.आय.ए च्या गुन्ह्यात फरार होते. त्यांच्यावर प्रत्यकी ५ लाख रुपयांचे बक्षिस घोषित करण्यात आले होते. दरम्यान, कोथरूड पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांचा एक साथीदार पसार झाला. चौकशीत ते दहशतवादी असल्याचे उघडकीस आले. त्यांच्या कोंढव्यातील घरातून लॅपटॉप, टॅब, वजनकाटा, ड्रोन, नकाशा, बॅटरीसेल, इलेक्ट्रॉनिक सर्कीट, सोल्डरींग गन व काळ्या रंगाची केमीकल पावडर, वेगगवेगळी उर्दु व अरेबिक भाषेतील पुस्तके जप्त केले होते.

आरोपींनी देशाच्या एकतेस, अखंडतेस आणि सुरक्षीततेस धोका निर्माण करण्यासाठी बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण घेतले आहे. त्यांनी बाळगलेल्या साहित्याची तपासणी केली असता, ते दहशतवादी असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, संबंधित दहशतवाद्यांना पुण्यात आल्यानंतर त्यांना आश्रय देणार्‍यास एटीएसने अटक केली आहे. त्याच्याकडे तपास करण्यास सुरूवात केली आहे.