March 12, 2026

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत राष्ट्रवादीच्या बापू भेगडे यांनी घातल्या महिला अधिकाऱ्याला शिव्या

तळेगाव, १४ जून २०२४ : मावळमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष बापू भेगडे यांनी महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. हा सर्व प्रकार तळेगाव दाभाडे नगर परिषदेत घडला आहे. मुख्याधिकारी यांच्यासमोरच घटना घडली असून भेगडे त्या वायरल झालेल्या व्हिडिओ मध्ये शिव्या घालताना दिसत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बापू भेगडे हे नगर परिषदेत त्यांच्या शिष्टमंडळासह गेले होते. नगर परिषदेने मिळकत करवाढ केल्याने यावर त्यांनी जाब विचारला. एवढा करवाढ कसा लागू झाला असा प्रश्न त्यांनी व त्यांची शिष्टमंडळाने केला. त्यावर एका महिला अधिकाराने उत्तर दिले मात्र, महिला अधिकारी यांनी दिलेलं उत्तर उपस्थितांना अवास्तव वाटलं. त्यामुळं बापू भेगडे हे संतापले आणि त्यांनी महिला अधिकारी यांना उद्देशून अर्वाच्च भाषा वापरली. महिला अधिकारी यांनी त्यांना प्रतिउत्तर देत व्यवस्थित बोला असे सांगत पलटवार केला. तेव्हा, बापू भेगडे अधिकच संतापले आणि त्यांनी खुर्चीवरून उभे राहात महिलेला चांगलंच सुनावले. एकेरी भाषा वापरत शिवीगाळ केली. त्यावेळी,काही जण भेगडे यांना शांत करण्याचा प्रयत्न करत होते, तरी ही भेगडे यांचा राग कमी झाला नसल्याचे त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे.

बापू भेगडे हे महायुतीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी असून राज्यात त्यांची सत्ता आहे. अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत. त्या पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष यांनी अशी भाषा वापरणे अशोभनीय असल्याचं बोललं जातं आहे. या घटनेबाबत बापू भेगडे यांच्याकडून प्रतिक्रिया मिळविण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले, कारण ते प्रतिक्रिया देण्यास अनुपलब्ध होते. तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप रायण्णवार यांनी या प्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याची माहिती दिली.