पुणे, 22/02/2025- जैवविविधतेच्या जाळ्याने संपूर्ण सजीवसृष्टी बांधली गेली असून त्यावर आपलेही अस्तित्व अवलंबून आहे. अशा या अमूल्य जैवविविधतेचा ऱ्हास हे जगासमोर एक मोठे आव्हान बनले आहे. या आव्हानांवर मात करण्यासाठी नैसर्गिक संसाधनांच्या दस्तऐवजीकरणाची लोकसहभागीय प्रक्रिया ‘लोक – जैवविविधता नोंदवही’ हे पुस्तक ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ आणि सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. विजय एदलाबादकर यांनी लिहिले असून या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा वनराई संस्थेत पार पडणार आहे. मंगळवार, दिनांक २५ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ५ : ०० वा. पर्वती येथील मित्रमंडळ चौकातील वनराई संस्थेच्या कार्यालयात हा सोहळा होणार आहे. याचे प्रकाशन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या शुभहस्ते होणार आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. देवाजी तोफा आणि माजी खासदार ऍड. वंदनाताई चव्हाण हे यावेळी उपस्थित असणार आहेत. या कार्यक्रमास प्रवेश विनामुल्य आहे.
स्थानिक जैवविविधतेचे संरक्षण, शाश्वत वापर आणि जैवविविधतेचे दस्तऐवजीकरण करण्याच्या उद्देशांतून २००२ मध्ये भारतात जैवविविधता कायदा मंजूर झाला. या उद्देशांच्या पूर्ततेची जबाबदारी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपरिषद आणि महानगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांची आहे. त्यासाठी या सर्व संस्थांच्या स्तरावर ‘जैवविविधता व्यवस्थापन समित्या’ स्थापन करणे सदर कायद्यानुसार बंधनकारक आहे. या समित्यांनी दरवर्षी आधुनिक माहिती-तंत्रज्ञानाच्या वापरातून एका सुव्यवस्थित डेटाबेसमध्ये स्थानिक जैवविविधतेचे दस्तऐवजीकरण लोक-जैवविविधता नोंदवही (PBR) स्वरूपात संकलित करणे, अपेक्षित आहे. या माहितीचा उपयोग जैवविविधतेचे संवर्धन, व्यवस्थापन करण्यासाठी आणि पर्यावरणावरील परिणामांवर देखरेख ठेवण्याबरोबर पर्यावरणपूरक विकासाची स्थलानुरूप ध्येय-धोरणे ठरवण्यासाठीचा हा एक महत्त्वपूर्ण दस्तऐवज असणार आहे.
जागरूकतेचा अभाव, माहिती संकलनाचे स्रोत, पद्धती आणि एकूणच प्रक्रियेबद्दल अनभिज्ञता यांमुळे मोजक्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे अपवाद वगळता बहुतांश ठिकाणी ‘लोक-जैवविविधता नोंदवही’बाबत फारसे समाधानकारक चित्र आढळत नाही. म्हणूनच यासंदर्भात सर्व स्तरांमध्ये लोकशिक्षण घडवून आणण्यासाठी या मार्गदर्शनपर पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे. सजग आणि जाणकार जनतेच्या सहभागाने आपल्या गाव-शहरातील जैवविविधतेची यादी कशी करता येऊ शकते याबद्दलची रूपरेषा मांडणारे हे एक दिशादर्शक पुस्तक असल्याचे वनराई संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.

More Stories
पुणे : रसिकलाल धारीवाल यांच्या स्मृतिदिनानिमित्त ३५० जणांचे रक्तदान; नववे वार्षिक शिबिर उत्साहात संपन्न
विमाननगरातील रामेश्वरम हॉटेलवर महापालिकेचा हातोडा; ६,५०० चौ. फूट बेकायदा बांधकाम जमीनदोस्त
Pune: विमानतळापर्यंत थेट मेट्रोची कनेक्टिव्हिटी – केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती