April 28, 2026

Pune: पथारी व्यावसायिकांसाठी अभय योजनेचा प्रस्ताव

पुणे, २७ एप्रिल २०२६ः महापालिकेने पथारी व्यावसायिकांना आकारण्यात येणारे दैनंदिन शुल्क ५ टक्के कमी करावे, तसेच पथारी व्यावसायिकांनाही त्यांच्या थकलेल्या पथारी शुल्कावर आकारण्यात आलेल्या दंडात ७५ टक्के सवलत देऊन एकरकमी परतफेड करण्यासाठी अभय योजना राबवायची की नाही याचा निर्णय आता महापालिकेच्या मुख्य सभेत होणार आहे.

या बाबतचा प्रस्ताव राष्ट्रवादीचे नगरसेवक सुहास टिंगरे, डाॅ. नंदिनी धेंडे यांनी स्थायी समितीत दिला होता. त्यावर महापालिका प्रशासनाने नकारात्मक अभिप्राय दिला असला, तरी स्थायी समितीने हा अभिप्राय मान्य करून हा प्रस्ताव मे महिन्याच्या मुख्यसभेत निर्णय घेण्यासाठी पाठविला आहे. त्यामुळे आता महापालिकेची मुख्य सभा पथारी व्यावसायिकांना दिलासा देणार, की त्यांच्याकडून दंड वसूल केल जाणार हे स्पष्ट होणार आहे. हा प्रस्ताव स्थायी समितीत ठेवल्यानंतर प्रशासनाने नकारात्मक अभिप्राय दिला. त्यावर टिंगरे यांनी हा अभिप्राय नामंजूर करण्याची मागणी केली होती.