July 24, 2024

पुण्यातील महिला पोलीस शिपाईला गुंगीचे ओैषध देऊन अश्लील चित्रफित काढत बलात्कार

पुणे, ०५/०९/२०२३: पुणे शहर पोलीस दलात एका पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या 28 वर्षीय एका महिला पोलीस शिपायाला शीतपेयातून गुंगीचे ओैषध देऊन तिच्यावर पोलीस शिपायाने बळजबरीने बलात्कार केल्याची आणि अश्लील चित्रफीत काढल्याची घटना उघडकीस आली आहे. पिडीत महिला पोलीस शिपायाला आरोपीने पिस्तुलाचा धाक दाखवून तिच्या घरातून पाच ते सहा तोळे सोन्याचे दागिने, लॅपटाॅप असा मुद्देमाल चोरल्याप्रकरणी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यातील पोलीस शिपायाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती पोलिसांनी दिली.

याप्रकरणी दीपक सीताराम मोघे (रा. स्वारगेट पोलीस वसाहत,पुणे) या आरोपीच्याविरुद्ध बलात्कार, अर्मस् ॲक्ट, धमकावणे आदी कलमानुसार गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित महिला पोलीस शिपायाने खडक पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पीडीत महिला आणि आरोपी दीपक सीताराम मोघे यांची ओळख होती. लॉकडाऊन मध्ये दीपक मोघे महिला पोलीस शिपायाच्या घरी जेवायला येत होता. त्यावेळी मोघेने महिलेला शीतपेयातून गुंगीचे ओैषध पिण्यास दिले. त्यानंतर तिला उलट्या आणि त्रास होत असल्याने तिला त्यांनी गोळ्या खाण्यास दिल्याने तिला आणखी गुंगी येऊन झोप लागली त्याचा गैरफायदा घेऊन आरोपीने तिच्यावर बलात्कार करुन अश्लील ध्वनिचित्रफीत तयार केली.
त्यानंतर ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमात तसेच ओळखीच्या लोकांमध्ये प्रसारित करण्याची धमकी त्याने दिली. महिला पोलीस शिपायावर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केले. तिला धमकावून पतीसोबत घटस्फोट घेण्यास भाग पाडले.

तसेच तिला पिस्तुलाचा धाक दाखवून घरातील पाच ते सहा तोळे दागिने, मोबाइल , लॅपटाॅप असा मुद्देमाल चोरी करून नेला. महिलेने याबाबत खडक पोलीस ठाण्यात तक्रार दिली. अनैसर्गिक कृत्य, बलात्कार, तसेच खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी मोघे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करणयात आला असून, सहायक पोलीस निरीक्षक एस तोटेवार पुढील तपास करत आहेत.