July 21, 2026

पुणे आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर राउंड रॉबिन बुद्धिबळ स्पर्धेत आठव्या फेरीत अभिजीत गुप्ता, अश्वथ एस, कुशाग्र मोहन यांचे विजय

पुणे,7 जुलै 2026: बुद्धिबळ क्रीडा ट्रस्टच्या वतीने आणि ‘द हॅबिटॅट’द्वारे प्रायोजित पुणे आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर राउंड रॉबिन बुद्धिबळ स्पर्धेत आठव्या फेरीत अव्वल मानांकित ग्रँड मास्टर अभिजीत गुप्ता, आंतरराष्ट्रीय मास्टर अश्वस्थ एस, आंतरराष्ट्रीय मास्टर कुशाग्र मोहन या भारतीय खेळाडूंनी चमकदार विजयाची नोंद करताना विजेतेपदासाठी आपले आव्हान कायम राखले. अभिजीत गुप्ता 6.5गुणांसह आठव्या फेरी अखेर गुण तालिकेत अव्वल स्थानावर असून अश्वथ एस आणि कुशाग्र मोहन प्रत्येकी 6गुणांसह अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत. आता आज(8 जुलै रोजी) स्पर्धेतील अखेरची नववी फेरी खेळली जाणार असून अभिजीत गुप्ता, अश्वथ एस आणि कुशाग्र मोहन हे तीनही भारतीय खेळाडू विजेतेपदाच्या शर्यतीत आहेत.

मुंडवा येथे ‘द फेर्न हॅबिटॅट’ येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत राउंड रॉबिन आठव्या फेरीतील आजच्या लक्षवेधी लढतीत भारताचा आंतरराष्ट्रीय मास्टर कुशाग्र मोहन याने श्रीलंकेच्या आंतरराष्ट्रीय मास्टर डिसिल्वा एलएमएसटी याचा पराभव करून आपली घौड दौड कायम राखली. या सामन्यात पांढरी मोहरी घेऊन खेळताना कुशाग्र याने रुयलोपेझ व्हेरीएशन प्रकारच्या आक्रमणाचा वापर करीत डावाला प्रारंभ केला. परंतु डिसिल्वाने स्पॅनिश ओपनिंगने सुरुवात करून कुशाग्रला चकित केले. तरीही अशा प्रकारच्या ओपनिंग प्रत्युत्तराचा अनुभव असल्यामुळे कुशाग्र मोहन याने त्याला तोडीस तोड उत्तर दिले. एका क्षणी कुशाग्र कडून एक चुकीची चाल खेळली गेली. मात्र त्या चुकीचा फायदा डिसिल्वाला घेता आला नाही. दोन्ही खेळाडूंचे दोन हत्ती बाकी असताना व डावाचा शेवट नजीक येत असताना डिसिल्वाने केलेल्या घोडचुकीचा फायदा घेत कुशाग्र ने लवकरच निर्णायक विजयाची नोंद केली.

आजच्या फेरीच्या अन्य लढतींमध्ये ग्रँड मास्टर अभिजीत गुप्ताने अमेरिकेचा वैद्यनाथन कन्नन याचा सहज पराभव केला. तर, आंतरराष्ट्रीय मास्टर अश्वस्थ एस याने भारताच्याच आंतरराष्ट्रीय मास्टर अक्षय बोरगावकरवर मात केली. मात्र, भारताच्याच आंतरराष्ट्रीय मास्टर नितीश बेलूरकर याने बेलारूसचा ग्रँड मास्टर अलेक्झांड्रोव्ह अलेक्सेजला कडव्या झुंजीनंतर बरोबरीत रोखून आश्चर्यकारक निकालाची नोंद केली.

गुण तालिकेत असलेल्या दुसऱ्या अश्वथ एस याने अखेरच्या लढतीत विजय मिळविल्यास त्याला निश्चितपणे ग्रँड मास्टर पद मिळणार आहे. तर, आंतरराष्ट्रीय मास्टर कुशाग्र मोहन याने विजय मिळविल्यास त्याला ग्रँड मास्टर नॉर्म मिळणार आहे. पुण्याचा फिडे मास्टर अद्विक अगरवाल याला आंतरराष्ट्रीय मास्टर नॉर्म मिळवण्यासाठी 0.5गुणांची आवश्यकता आहे.

तत्पूर्वी आठव्या फेरीचे उद्घाटन किशोर पंप्सचे व्यवस्थापकीय संचालक किशोर देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी चीफ आरबीटर आर श्रीवत्सन, डेप्युटी चीफ आरबीटर आयए अथर्व गोडबोले आणि आयए दिप्ती शिदोरे आदी उपस्थित होते. स्पर्धेच्या प्रारंभी ज्येष्ठ बुद्धिबळ संघटक प्रकाश कुंटे यांच्या आज झालेल्या दुःखद निधनामुळे त्यांना उपस्थितांकडून मौन बाळगून श्रद्धांजली वाहण्यात आली.

निकाल: राउंड रॉबिन आठवी फेरी:
कुशाग्र मोहन(1गुण)(भारत)वि.वि.डिसिल्वा एलएमएसटी(0गुण)(श्रीलंका);
अभिजीत गुप्ता(1गुण)(भारत)वि.वि.वैद्यनाथन कन्नन(0गुण)(अमेरिका);
अश्वथ एस(1गुण)(भारत)वि.वि.अक्षय बोरगावकर(0गुण)(भारत);
नितीश बेलुरकर(0.5गुण)(भारत)बरोबरी वि.अलेक्झांड्रोव्ह अलेक्सेज(0.5गुण)(बेलारूस);
फेडरोव्ह अलेक्सी(0.5गुण)(बेलारूस)बरोबरी वि. अद्विक अगरवाल(0.5गुण)(भारत).