May 19, 2024

महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या वतीने येत्या १५ ते २३ मे दरम्यान बालरंग महोत्सवाचे आयोजन

पुणे, दि. ६ मे, २०२४ : उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मुलांचे निखळ, सकस मनोरंजन व्हावे, त्यांच्या क्षमतांचा विस्तार व्हावा व व्यक्तीमत्त्व विकास व्हावा या उद्देशाने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी पुण्यातील महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या वतीने येत्या १५ ते २३ मे दरम्यान बालरंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या खजिनदार शुभांगी दामले यांनी दिली आहे.

सदर वर्ष हे महोत्सवाचे रौप्यमहोत्सवी वर्ष असून यानिमित्ताने विविध शिबिरे, कार्यशाळा, मुलांसाठीची नाटके यांचा समावेश असलेला हा बालरंग महोत्सव टिळक रस्त्यावरील हिराबाग चौक येथील ज्योत्स्ना भोळे सभागृह इमारतीच्या पहिला मजल्यावर असलेल्या श्रीराम लागू रंग – अवकाश या ठिकाणी सायं ४ ते ८ या वेळेत संपन्न होईल. महोत्सवामध्ये विविध प्रकारची सहा शिबिरे व कार्यशाळा यांचा अंतर्भाव असून या प्रत्येक शिबिरामध्ये सहभागी होणाऱ्या २५ मुलांना कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही, ही शिबिरे पूर्णत: विनामूल्य असतील, अशी माहितीही दामले यांनी दिली.

याविषयी अधिक माहिती देताना त्या पुढे म्हणाल्या, “उन्हाळी सुट्टी लागली की मुलांना आणि त्यांच्या पालकांना वेध लागतात ते विविध शिबिरांचे. या शिबिरांमध्ये मुलांनी धमाल मजा मस्ती करावी, त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, यासोबतच मुलांची नाटकांविषयीची अभिरुची वाढत एक चांगला प्रेक्षकवर्ग तयार व्हावा या उद्देशाने गेली २५ वर्षे महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या वतीने बालरंग महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. १० ते १४ या वयोगटातील मुला मुलींसाठी कार्यशाळा, शिबिरे आणि नाटके यांचे आयोजन या दरम्यान करण्यात येते.”

महोत्सवाबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की, महोत्सवा दरम्यान येत्या १५ ते २१ मे रोजी ताल- लय यांवर आधारित खेळ, कविता, बंदिशींचे सोपे शिक्षण देणाऱ्या संगीत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. स्वानंदी सडोलीकर या शिबिराच्या प्रशिक्षक असतील. यासोबतच शिवाजी माने यांच्या विज्ञान खेळणी तयार करण्याचे शिबिर १५ ते १८ मे दरम्यान होईल. पार्थ मवाळ यांचे मार्शल आर्ट्सचे प्रशिक्षण देणारे स्वसंरक्षण शिबिर हे १५ ते २१ मे दरम्यान संपन्न होईल. अनुश्री ढवळे यांचे मातीकाम शिबिर १५ ते १७ मे आणि २३ मे रोजी होईल. मुक्ता व निकेतन यांचे बॉलीवूड डान्स शिबिर १५ ते २१ मे रोजी तर कोकीळ सर यांचे गणितातील गमतीजमती हे शिबिर १८ ते २१ मे रोजी संपन्न होणार आहे. सर्व शिबिरांच्या वेळा या ४ ते ६ अशा असणार आहेत.

या शिबिरांनंतर दररोज सायं ६.३० ते ६.४५ दरम्यान व्हायोलिन वादन, पपेट शो, म्युझिक जॅमिंग, बबल शो, कथा व गाणी असे प्लॅटफॉर्म सादरीकरण असलेले कार्यक्रम होणार आहेत. यानंतर सायंकाळी ७ वाजल्यापासून मुलांसाठीची नाटके श्रीराम लागू रंग अवकाश येथे सादर होतील. यामध्ये १५ मे रोजी झी अवॉर्ड विजेते ‘चेरी एके चेरी’ (सादरकर्ते – श्रीनिधी झाड /तन्मय भिडे), १६ मे रोजी ‘आभाळमाया | शाळेची गाणी’ (सादरकर्ते – सातपुते | काळे सर), १७ मे रोजी ‘पक्का लिंबू टिंबू’ (सादरकर्ते – अरुंधती आगाशे), १८ मे रोजी ‘आलंय आमच्या लक्षात’ (सादरकर्ते – आदित्य यादव), १९ मे रोजी कुमुद मिश्रा निर्मित व विक्रांत ठकार दिग्दर्शित ‘राजा नंग धडांगा है’, २० मे रोजी ‘मिंगलिश मिडियम’ (सादरकर्ते – ऋचा आपटे), २१ मे रोजी ‘सुपरहिरो’ (सादरकर्ते – निकेतन नंदुरबारे), २२ मे रोजी ‘एक डोकं चार पाय’ (सादरकर्ते – सोहम आठवले) आणि २३ मे रोजी ‘मिस कॉम्पिटिशन’ (सादरकर्ते – सोहम आठवले) ही मुलांसाठीची नाटके सायं ७ वाजल्यापासून सादर होतील.

बालरंग महोत्सवात तब्बल सहा शिबिरे, कार्यशाळा आणि आठ प्लॅटफॉर्म सादरीकरणे होणार आहेत. या प्रत्येक शिबिरामध्ये सहभागी होणाऱ्या २५ मुलांना कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही, ही शिबिरे पूर्णत: विनामूल्य असतील. मात्र त्यानंतर होणारी मुलांसाठीची नाटके ही सशुल्क असतील याची कृपया नोंद घ्यावी.