June 4, 2026

एकाग्र मनाने तानपुऱ्याच्या षड्जामध्ये आपला सूर मिसळणे हा प्रत्येक कलाकाराचा पहिला पुरस्कार – ख्यातनाम गायिका आरती अंकलीकर टिकेकर

पुणे, दि. ११ एप्रिल, २०२६ : शास्त्रीय संगीताची साधना जेव्हा सुरु होते तेव्हा तानपुऱ्याच्या त्या चार तारा एकाग्र मनाने एका सुरात लावणे, तो तानपुरा छेडणे आणि नंतर त्या तानपुऱ्यात वाजणाऱ्या षड्जामध्ये आपला सूर बेमालूमपणे मिसळणे यामध्ये जे मन एकाग्र करावे लागते तो क्षण म्हणजे प्रत्येक कलाकाराचा पहिला पुरस्कार असतो, असे मत ख्यातनाम गायिका आरती अंकलीकर टिकेकर यांनी व्यक्त केले.

गुरुकुल कलाश्री संगीत मंडळ यांच्या वतीने आयोजित करण्यात येणारा तीन दिवसीय कलाश्री संगीत महोत्सव पिंपळेगुरव येथील नटसम्राट निळू फुले रंगमंदिर येथे संपन्न झाला. महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी मंडळाच्या वतीने माजी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या स्मरणार्थ कलाश्री पुरस्कार यावर्षी आरती अंकलीकर- टिकेकर यांन प्रदान करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या. कलाश्री पुरस्काराचे हे २८ वे वर्ष असून रोख रु. १ लाख ५१ हजार १०१, मानचिन्ह आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

चंद्ररंग समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य लक्ष्मण जगताप, उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते विजू शेठ जगताप, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील नगरसेवक प्रशांत शितोळे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती नाना शिवले, प्रसिद्ध कीर्तनकार चेतनानंद गावडे महाराज, प्रसिद्ध तबलावादक पं. रामदास पळसुले, ओअॅसिस एन्टरप्राईजेस मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संगीत अलंकार महेश जोशी, गुरुकुल कलाश्री संगीत मंडळाचे संस्थापक आणि किराणा घराण्याचे शास्त्रीय गायक पं. सुधाकर चव्हाण, कलाश्रीचे विश्वस्त सच्चिदानंद कुलकर्णी, नंदकिशोर ढोरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

याबरोबरच मंडळाच्या वतीने शकुंतला ढोरे यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा कलाश्री युवा पुरस्कार पं योगेश समसी यांचे शिष्य, युवा तबला वादक सोहम गोराणे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. रोख रु. ११ हजार मानचिन्ह व मानपत्र असे कलाश्री युवा पुरस्काराचे स्वरूप आहे

आपला सुंदर तानपुरा आपल्याला सुरात मिळवता आला, तो सुंदर छेडीता आला की तो जणू काही आपली जपमाळ बनतो. यानंतर मन एकाग्र करायचे आणि त्या तानपुऱ्याच्या झनकारात उमटणाऱ्या स्वरात आपला स्वर असा मिसळायचा की तो वेगळा वाटताच कामा नाही इथे आपल्या संगीताच्या साधनेला सुरुवात होते, असे आरती अंकलीकर टिकेकर म्हणाल्या.

मन एकाग्र करणे म्हणजे काय, याची सुरुवात मला गुरुंनी अशीच करून दिली. माझा प्रत्येक पुरस्कार म्हणूनच माझे सर्व गुरु आणि आई वडील यांना समर्पित आहे असे सांगत त्या पुढे म्हणाल्या, “शास्त्रीय संगीताची साधना ही खडतर आणि कष्टाची साधना आहे. यामध्ये सुरुवातीची अनेक वर्षे विद्यार्थी हा फक्त रियाजच करीत असतो. कोणत्याही प्रकारचे यश, प्रसिद्धी ही त्याला सुरुवातीच्या या काळात मिळत नाही. केवळ रियाज करत राहणे आणि गात राहणे हेच संगीत साधकाचे काम असते. त्यामुळे ज्यांना गायला आवडते, वाजवायला आवडते त्यांनीच या क्षेत्रात यावे असा सल्लाही आरती अंकलीकर टिकेकर यांनी दिला. माझ्या यशाचे श्रेय हे श्रोत्यांचे देखील आहे असेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाश थिटे यांनी केले.

You may have missed