February 27, 2024

जैन धर्माने अहिंसा खऱ्या अर्थाने आत्मसात केली – देवदत्त पट्टनाईक

पुणे, दि. २६ नोव्हेंबर, २०२३: बुद्धाच्या आधी काही शतके जैन धर्म अस्तित्त्वात होता. भारतीय संस्कृतीचे महत्त्वाचे तत्व समजल्या गेलेल्या अहिंसेला खऱ्या अर्थाने जैन धर्माने आत्मसात केले. जैन समुदायाने उपवासाला दिलेले महत्त्व हे त्याचेच प्रतिक आहे. इतकेच नव्हे तर जगाला सुरुवातीची लेखन पद्धती ही व्यापारी लोकांनी अर्थात जैनांनी दिली असे प्रतिपादन पौराणिक कथाकार आणि लेखक देवदत्त पट्टनाईक यांनी केले

पुण्यातील दखनी अदब फाउंडेशनच्या वतीने एकाहून एक सरस कविता, गझल्स, मुलाखती, चर्चासत्रे, नाटक आणि सांगीतिक कार्यक्रम यांची रेलचेल असलेल्या चौथ्या दोन दिवसीय डेक्कन लिटरेचर फेस्टिव्हलच्या दुसऱ्या दिवसाच्या दुपारच्या सत्रात पट्टनाईक बोलत होते.

जंगली महाराज रस्त्यावरील बालगंधर्व रंगमंदिर येथे संपन्न होत असलेल्या या महोत्सवास यावेळी महोत्सवाच्या मुख्य समन्वयिका मोनिका सिंग, पद्मश्री पं. रामदयाल शर्मा, शाहीर सुरेश कुमार वैराळवर, सलीम आरिफ, फाउंडेशनचे जयराम कुलकर्णी, मनोज ठाकूर, रवी तोमर, युवराज शाह आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी आयोजित ‘डिकोडिंग दी स्टोरीज ऑफ गॉड्स अँड सेंट्स’ या मुलाखतपर कार्यक्रमात सुप्रसिद्ध लेखिका सुधा मेनन यांनी पट्टनाईक यांच्याशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले, “जैन धर्मीय हे मुख्यत्वे व्यापारी होते. सुरुवातीला हिशेब ठेवण्यासाठीच लेखन सुरु झाले. यातच पुढे शून्य आणि इन्फिनिटी यांची भर पडली. जैन धर्मीयांची ही गणितीय देणगी जगासाठी उपयुक्त ठरली.”

जैन परंपरेतील ऋषभदेवांच्या मुलींची नावे ब्राह्मी आणि सुंदरी अशी सांगितली जातात. यातील ब्राह्मी ही लिपींची जननी तर सुंदरी ही गणिताशी संबंधित आहे, याची आपल्याला माहितीच नाही याकडे देवदत्त पट्टनाईक यांनी लक्ष वेधले.

सरस्वती अर्थात विद्या ही भारतीय ज्ञानाचे प्रतिक आहे. आपल्या शैक्षणिक अभ्यासक्रमात यावर बोलले जात नाही. आपल्या शिक्षणात देखील सरस्वतीला महत्त्व नाही. आपण अभ्यास करतो ते चांगली नोकरी मिळविण्यासाठी, आपल्याला दुर्गेच्या रुपात बदलाचे प्रतिनिधी, साक्षीदार व्हायचे असते. मात्र शिकण्यासाठी ज्ञानप्राप्तीसाठी आपण ज्ञानग्रहण करत नाही, असे परखड मत पट्टनाईक यांनी व्यक्त केले.

भारतातील अनेकविध समुदायाला आपल्याला समजून घ्यायचे असेल तर त्यांच्या कथा ऐकायला हव्यात. त्यावरून त्यांची विचारधारा आणि ते जगाकडे कसे बघतात हे आपल्याला कळू शकते असे सांगत ते म्हणाले, “पौराणिक साहित्यात दख्खन महत्त्वाचे आहे मात्र दख्खनचा उल्लेख खूप कमी येतो. दख्खन म्हटले की कृष्णा नदी येते, विदर्भ येतो, अगस्त्य मुनी, गौतम ऋषी येतात. परशुरामांसोबत कोकण आणि केरळ यांचा उल्लेख येतो. या पौराणिक कथांमधून आपल्याला भूगोल आणि इतिहास दोन्हीही माहिती होते.”

सध्या आपल्याकडे हिंसक व्यक्तीरेखा या अधिक ग्लॅमराईज केल्या जात आहेत. जैन धर्मियांमध्ये बाहुबली हे अहिंसक प्रतिक आहे मात्र सध्या बाहुबली या शब्दाला वेगळाच अर्थ प्राप्त झाला आहे, असेही पट्टनाईक म्हणाले. यानंतर मराठी लेखकांशी गप्पांचा ‘मराठी साहित्यसंवाद – त्रिधारा’ हा कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये प्रवीण बांदेकर, मेघना पेठे, आसाराम लोमटे यांच्याशी रणधीर शिंदे यांनी संवाद साधला. यानंतर लुब्ना सलीम आणि हर्ष छाया या कलाकारांचे ‘हमसफर’ हे हिंदी नाटक सादर झाले. प्रेम, कुटुंब आणि नातेसंबंध यांचे आयाम दाखविणारे, जावेद सिद्दीकी लिखित, सलीम आरिफ दिग्दर्शित हे नाटक रसिकांसाठी एक पर्वणीच ठरले.