पुणे, ०९/०९/२०२४: श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला अनेक भक्त विविध प्रकारचे सोने, चांदीचे दागिने अर्पण करतात. यंदाच्या गणेशोत्सवात सॉलिटेरियो डायमंडस तर्फे गणपतीला ५० लाख रुपयांचा हिऱ्याचा तिलक अर्पण करण्यात आला आहे. गणरायाच्या शुंडाभूषणामध्ये हा तिलक बसविण्यात आला असून यामुळे लाडक्या गणरायाचे रूप अधिकच विलोभनीय दिसत आहे.
उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी सॉलिटेरियो डायमंडसचे मालक प्रख्यात बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय यांनी श्रीं चे दर्शन घेत हा तिलक अर्पण केला आहे. यावेळी ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, सौरभ रायकर, मंगेश सूर्यवंशी, तुषार रायकर, अमोल चव्हाण आदी उपस्थित होते.
विवेक ओबेरॉय म्हणाले, मी जेव्हा इथे येतो, तेव्हा तेव्हा गणपतीचे दर्शन घेऊन मन भरून येते. एवढ्या मोठया प्रमाणात गर्दी असून देखील अत्यंत शांतपणे येथे दर्शन घेता येते. वर्षानुवर्षे येथे गर्दी वाढत असली, तरी देखील सगळ्यांना नीट दर्शन मिळते, हे मंडळाचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी केलेल्या उत्तम व्यवस्थेचे यश असल्याचे त्यांनी सांगितले.
सॉलिटेरियो डायमंडस तर्फे १२ दिवस हा ६६ कॅरेट हि-याचा तिलक साकारण्याचे काम सुरु होते. गणरायांच्या आभूषणांपैकी असलेल्या शुंडाभूषणाच्या वरच्या बाजूला हा तिलक लावण्यात आला आहे. तब्बल १५० तास कारागिरांनी अत्यंत कलाकुसरीने हा हिऱ्याचा तिलक साकारला आहे.. गणेशोत्सवात भाविकांना हा हिऱ्याचा तिलक पाहता येणार असल्याचे ट्रस्टतर्फे सांगण्यात आले.
More Stories
पुण्यात कसबा मतदारसंघात भाजपमध्ये भडकले पोस्टर वाॅर, रासने घाटांची एकमेकांना आव्हान
पुणे: आगामी विधानसभा निवडणुकांसाठी शहर भाजप मध्ये होणार अंतर्गत मतदान
हडपसर मध्ये प्रशांत जगताप यांना मुस्लिम समाजाचे आव्हान, शरद पवारांकडे महत्वाची मागणी