July 22, 2024

प्रसिद्ध कथक गुरु डॉ नंदकिशोर कपोते यांना वैष्णव पुरस्कार प्रदान

पुणे, दिनांक २८ जून, २०२३ : कलाश्री संगीत मंडळातर्फे दरवर्षी देण्यात येणारा वैष्णव पुरस्कार यावर्षी संगीत नाटक अकादमीचा ’फेलो सन्मान’ प्राप्त प्रसिद्ध कथक नर्तक गुरु डॉ नंदकिशोर कपोते यांना आज प्रदान करण्यात आला. मयूर कॉलनी कोथरूड येथील बालशिक्षण प्रशालेच्या एमईएस सभागृहात टेक एक्सपर्ट, बँक ऑफ महाराष्ट्र व सिटी राईज क्राफ्टेड बाय अमनोरा यांच्या सहकार्याने आयोजित ‘नामाचा गजर’ या संत रचना व अभंगांच्या कार्यक्रमात टेक एक्सपर्टचे समूह संचालक जे व्ही इंगळे यांच्या हस्ते सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला.

अमनोरा टाऊनशिपच्या माध्यम व विपणन विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक प्रसाद वाघ, मेघा इंगळे, कलाश्री संगीत मंडळाचे अध्यक्ष सुधाकर चव्हाण, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे सुपुत्र श्रीनिवास जोशी आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. ह भ प कै. विश्वनाथ महाराज इंगळे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ दरवर्षी सदर पुरस्कार प्रदान करण्यात येतो. पुरस्काराचे हे ७ वे वर्षे असून रुपये ११ हजार रोख व मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते.पुरस्काराला उत्तर देताना डॉ नंदकिशोर कपोते म्हणाले, “माझे गुरू पद्म विभूषण पंडित बिरजू महाराज यांकडे गुरू शिष्य परंपरेत कथक नृत्य शिकत असताना तू महाराष्ट्रात माझ्या लखनऊ शैलीचा प्रचार प्रसार कर असे सांगत त्यांनी मला महाराष्ट्रात पाठविले. त्यांच्या आज्ञेने मी  गेली ४० वर्षे नृत्य प्रशिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे. जोपर्यंत तुझ्या पायात घुंगरू आहे तोपर्यंत मी सोबत आहे, असे त्यांनी मला सांगितले होते. आजही मी त्यांच्या आज्ञेचे पालन करत आहे. प्रत्येक पुरस्कार हा मला स्फूर्ती आणि अधिक काम करण्याची ताकद देत असतो. आजही वैष्णव पुरस्कार मिळाल्याचा मला आनंद आहे. यामागे माझे गुरू आणि आई वडील यांचे आशीर्वाद आहेत असे मी मानतो.”