पुणे, दि. २२ जुलै, २०२४ : संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात श्री स्वामी समर्थांचे निवास्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे आवश्यक विकासाच्या दृष्ट्याने सुरु होत असलेल्या ‘अनुभूती’ या प्रकल्पाला पुण्यातील ज्येष्ठ नागरिक विनिता वाडेगांवकर यांनी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत नुकताच २ लाख रुपयांचा धनादेश निधी म्हणून सुपूर्त केला.
अक्कलकोट नरेश श्रीमंत मालोजीराजे भोसले (तृतीय) यांनी हा निधी स्वीकारला. यावेळी विनिता वाडेगांवकर यांच्या कन्या डॉ उमा नामपूरकर आणि अनुभूती प्रकल्पाचे वास्तुविशारद महेश नामपूरकर हे देखील उपस्थित होते.
नुकत्याच झालेल्या गुरुपौर्णिमेनिमीत्त विनिता वाडेगांवकर यांनी अनुभूती या प्रकल्पाला आपलाही हातभार लागावा या उद्देशाने आपल्या निवृत्तीवेळची काही रक्कम यावेळी निधी स्वरूपात दिली. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट हे श्री स्वामी समर्थांचे निवासस्थान जागृत देवस्थान म्हणून भक्तांमध्ये प्रसिद्ध आहे. देशासोबतच अगदी परदेशामधूनही या ठिकाणी भाविक महाराजांच्या दर्शनासाठी आणि आध्यात्मिक अनुभूतीसाठी येत असतात. मात्र येथे असलेल्या पायाभूत सुविधा या पुरेशा नसल्याने अक्कलकोट येथे भाविकांना अनेकविध सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि या ठिकाणी त्यांची सर्व सोय व्हावी या उद्देशाने अक्कलकोट नरेश श्रीमंत मालोजीराजे भोसले यांच्या संकल्पनेमधून ‘अनुभूती’ हा प्रकल्प ५५ एकर परिसरात साकारला जात आहे. यामध्ये भक्तांसाठी सर्व सोयीसुविधांनी युक्त असा निवासी प्रकल्प, फूडकोर्ट, पार्किंग व्यवस्था, कॅन्टीन, सामाजिक बांधीलकी जपणारे सेवाग्राम हे रुग्णालय, अक्कलकोटच्या इतिहासाची माहिती देणारा प्रकल्प, लाईट अँड साउंड शो अशा अनेक गोष्टी लवकरच उभ्या राहणार आहेत.
अक्कलकोटमध्ये येणाऱ्या प्रत्येक भाविकासाठी या प्रकल्पाद्वारे अनेक चांगली कामे होतील, अक्कलकोट शहराचा विकास होईल आणि शहराचा कायापालट होऊन स्थानिक आणि भक्तांनाही त्याचा फायदा होईल, म्हणून अनुभूती प्रकल्पाला निधी दिल्याच्या भावना विनिता वाडेगांवकर यांनी व्यक्त केल्या. या ठिकाणी उभारल्या जाणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या १०८ फूट उंच पुतळ्याने या भागातील धार्मिक पर्यटन वाढेल आणि नजीकच्या भविष्यात तरुण पिढी देखील या ठिकाणी आध्यात्मिकदृष्ट्या आकर्षित होईल, असा विश्वासही विनिता वाडेगांवकर त्यांनी व्यक्त केला.
याबरोबरच गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत स्वामींच्या पादुका आणि स्वामींच्या हातात नेहमी असणारा सूर्यमणी भक्तांना दर्शनासाठी खुला ठेवण्यात आला होता. लवकरच जास्तीत जास्त भक्तांना याचे दर्शन व्हावे या उद्देशाने हा सूर्यमणी विविध ठिकाणी दर्शनासाठी उपलब्ध करून दिला जाईल असे यावेळी अक्कलकोट नरेश श्रीमंत मालोजीराजे भोसले (तृतीय) यांनी सांगितले.
More Stories
पुणे महापालिकेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
भाजपच्या मंडळ अध्यक्षांच्या निवडीत केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांचे वर्चस्व
मेट्रो स्थानके, विमानतळ तसेच पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पिंक ई-रिक्षाला फीडर सेवेचा दर्जा देणार-उपमुख्यमंत्री अजित पवार