April 30, 2024

पुणे शहरात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदार जागृतीवर भर द्या-डॉ.राजेंद्र भोसले

पुणे, 16 एप्रिल 2024: लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत पुणे शहरातील मतदानाचे प्रमाण वाढविण्याससाठी पुणे महानगरपालिकेतर्फे मतदार जागृती अभियान राबविण्यात यावे, असे निर्देश पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ.राजेद्र भोसले यांनी दिले.

पुणे महानगरपालिका येथे मतदार जनजागृतीबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस अतिरिक्त महापालिका आयुक्त रवींद्र बिनवडे, उप आयुक्त महेश पाटील, राजू नंदकर, राहुल जगताप, नितीन उदास, कर संकलन प्रमुख सुनील मते आदी उपस्थित होते.

बैठकीत पुणे शहरातील मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी पुणे महानगपालिकेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती घेण्यात आली. डॉ.भोसले म्हणाले, मतदारांना त्यांचे मतदान कोणत्या मतदान केंद्रावर आहे याची माहिती देण्याची व्यवस्था करावी. त्यासाठी 1 मे पासून प्रत्येक प्रभाग कार्यालयात ‘नो युवर पोलिंग स्टेशन’ ही हेल्पलाईन सुरू करावी. हॉटेल, दुकाने व व्यापारी आस्थापनेतील कामगारांना मतदान करता यावे यासाठी त्यांना किमान दोन तास मतदानासाठी सुटी मिळेल याची खात्री करावी आणि त्यांना निवडणुकीविषयी माहिती द्यावी.

प्रभाग अधिकारी आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाने सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदार जागृती करावी. या विभागाकडील वाहनांद्वारेदेखील मतदार जागृतीवर भर देण्यात यावा. मतदार जागृती उपक्रमात युवकांना सहभागी करून घेत पथनाट्याद्वारे मतदानाचे महत्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात यावे. मतदान केंद्र परिसरात स्वच्छता राहील याची दक्षता घ्यावी. पीएमपीएमएलकडील बसेसवर आणि बस थांब्यावर मतदानाचे आवाहन करणारे आणि माहिती देणारे संदेश लावावेत.

आरोग्य विभागाने दिव्यांग आणि वयोवृद्ध मतदारांसाठी व्हीलचेअरचे सूक्ष्म नियोजन करावे. आकाशचिन्ह विभागाने 200 ठिकाणी मतदारजागृतीचे संदेश लावावे. बँकांनीदेखील आपल्याकडील मोकळ्या जागेत मतदार जागृतीचे संदेश लावावे. प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी खाजगी बसेस आणि उद्योगसंस्थांच्या बसेसच्या माध्यमातूनही जनजागृती करावी, असे निर्देश डॉ.भोसले यांनी दिले.

येत्या 5 मे रोजी कमी मतदान असलेल्या मतदान केंद्र परिसरात मोटर सायकल रॅलीद्वारे नागरिकांना मतदानाचे आवाहन करण्यात येणार आहे. तसेच महापालिका क्षेत्रातील बचत गटाच्या सदस्यांद्वारे जनजागृती करण्यात येईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.