April 30, 2024
Punekar News Marathi Logo

केवळ घोषणा नाहीत, पुण्याला विकासात नंबर एक बनवायचंय

पुणे, १६ एप्रिल २०२४ : शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न, अपुरा अन् कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, कचरा समस्या, महिलांची सुरक्षितता यासह विविध प्रश्न आणि समस्या सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. नुसत्या घोषणा करणार नाही तर पुण्याला विकासकामात क्रमांक एकवर आणायचे आहे, असे व्हिजन पुणे लोकसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात उतरलेल्या उमेदवारांनी मांडले. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीकडून भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि वंचितचे उमेदवार वसंत मोरे यांना एकाच मंचावर आणले होते. पत्रकार संघाचे अध्यक्ष पांडुरंग सांडभोर, सरचिटणीस सकृत मोकाशी उपस्थित होते.

महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ म्हणाले, गेल्या १० वर्षांत लाभार्थ्यांच्या खात्यात ३१ लाख कोटी रक्कम जनतेच्या खात्यात गेली. हा क्रांतिकारक बदल आहे. सर्वसामान्य माणसाचा विचार नेहमीच केला गेला. पुण्यात कागदावरची मेट्रो प्रत्यक्षात आली. मला अभिमानाने सांगावेसे वाटते की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मेट्रोचे उद्घाटन केले. स्वातंत्र्य नंतरच्या काळात पहिले महापालिकेचे वैद्यकीय महाविद्यालय पुण्यात तयार झाले. प्रधानमंत्री योजनेतून हजारो घरे तयार होताहेत. उड्डाणपूल झाले, कर्वे रस्ता पूर्ण झाला, सिंहगड उड्डाणपूल सुरु आहे. सार्वजनिक व्यवस्था सुधारण्यासाठी भर देण्यात आला आहे. पुणे महापालिकेने केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक कामे केली. सार्वजनिक व्यवस्था सुधारण्यासाठी ई-बस रस्त्यावर आल्या आहेत. उड्डाणपूल, नवीन रस्ते पूर्ण करण्यावर भर देण्याचा विचार आहे.

वंचितचे उमेदवार वसंत मोरे म्हणाले, शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविणे आवश्यक वाटते. स्वारगेटच्या एसटी डेपो शहराच्या चारही बाजूला केला पाहिजे. पीएमपीएमएलच्या बसेस उभारण्यासाठी जागा कुठे आहे? पार्किंगवर तोडगा काढायला पाहिजे. शहराच्या दक्षिण भागातील तलावांची साठवण क्षमता वाढवली तर दक्षिण पुण्याचा पाणीप्रश्न सुटेल. पुण्यातील एका भागाचा प्रश्न सुटला तर खडकवासला धरणातील पाण्यावर ताण येणार नाही. महापालिकेत त्या त्या विषयांचे ज्ञान असणारे अधिकारी बसवा, हा माझा, तो माझा म्हणून कोणालाही बसवू नका. नदी सुधार प्रकल्प २०२२ च्या अगोदर सुरु झालाय. त्याचे वास्तव आता समोर यायला लागले आहे. नदी अरुंद झाली आहे. नद्यांत स्वच्छ पाणी जायला पाहिजे. शहरात मोठ्या प्रमाणावर ड्रग्स सापडले आहे. महिलांसाठी स्वतंत्र पोलिस आयुक्त व्हायला पाहिजे, ससून रुग्णालयात आयसीयू विभागात तरुणाला उंदीर चावत आहेत. यामुळे आरोग्य व्यवस्थेचे धिंडोळे निघाले आहेत. मला लोकसभेत गेल्यावर कोणाच्या मागे बसून बाके वाजवायची नाहीत तर लोकांचे प्रश्न मांडायचे आहेत.

महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर म्हणाले, पुण्यात ट्रॅफिकची समस्या मोठी आहे. मेट्रोचा डीपीआर काँग्रेसने केला. नागपूरची मेट्रो पळत आहे. परंतु पुण्यात मेट्रोचे टप्प्याटप्प्याने उद्घाटन होत आहे. पालिकेचे अनेक प्रकल्प झाले, पर्यावरण कुठल्या दिशेला चाललंय. बालभारती पौड रस्ता करताना पर्यावरणाची काळजी घेतली पाहिजे. गॅसचे भाव किती वाढले आहेत, आज पेट्रोलचे भाव काय झालेत, आयुष्मान योजनेचे काय झाले, पुण्याची गुन्हेगारी, अमली पदार्थ तस्करी याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. नुसत्या घोषणा होत आहेत. कामे होत नाहीत. विचारांची लढाई विचारानेच होणार आहे. अमली पदार्थ प्रत्येकाच्या उंबऱ्यावर येऊन थांबले आहेत. नदी सुधार प्रकल्पाने नदीच्या पात्राची रुंदी कमी होऊन गटार झाले आहे. शेतकऱ्यांचे बरेच प्रश्न आहेत. खते महाग झाली आहेत. शेतमालाला हमीभाव मिळत नाही.
……

ते मनसेत येता येता राहिले रवींद्र धंगेकर मनसेतून काँग्रेसमध्ये आले. वसंत मोरे मनसेतून वंचितमध्ये आले. मुरलीधर मोहोळ यांनी भाजप कार्यालयावर हल्ला केला होता. त्यामुळे तिघांनी वैचारिक भूमिका स्पष्ट करावी. या प्रश्नावर मुरलीधर मोहोळ म्हणाले, मी एकच पक्षात ३० वर्षे आहे. त्यावर मोहोळ मनसेत येता येता राहिले, असे धंगेकर यांनी सांगताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. अंजली खमितकर यांनी सूत्रसंचालन केले. पूनम काटे यांनी आभार मानले.