June 22, 2025

स्वच्छता कर्मचारी ते शिक्षणाची यशोगाथा: स्वच्छता कर्मचारी प्रियंका कांबळे यांनी उत्तीर्ण केली दहावीची परीक्षा

पुणे, १४ मे २०२५: इयत्ता दहावीचा निकाल हा जाहीर झाला असून दहावीच्या निकालात विद्यार्थ्यांना घवघवीत यश मिळाला आहे. राज्यात तब्बल २११ विद्यार्थ्यांना शंभर पैकी शंभर गुण हे मिळाले आहेत. दहावीमध्ये यश प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होताना पाहायला मिळत आहे. शिक्षण हे खऱ्या आयुष्याला समृद्ध करते आणि यामुळे माणसाच्या आयुष्यात बदल होत जातात ही बाब लक्षात घेत पुणे महानगरपालिकेत सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या प्रियंका कांबळे यांनी देखील दहावीची परीक्षा देत घवघवीत यश प्राप्त केलं आहे.

काल (१३ मे) दहावीचा निकाल लागला असून विद्यार्थ्यांनी मोठ यश दहावीच्या परीक्षेत प्राप्त केलं आहे. असं असताना श्रीमती रमाबाई रानडे प्रौढ स्त्री हायस्कूल सेवासदनचा निकाल ९०% इतका लागला असून या परीक्षेस एकूण १० विद्यार्थिनींनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ९ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहे. ज्यात सुकन्या शिंदे हिने ७०.४०% गुण मिळवून प्रशालेमधे प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तर रेणुका कत्राबाद हिने ६५.६०% गुण मिळवून द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. प्रशालेमधुन इयत्ता दहावीच्या परीक्षेस बसलेल्या सर्वच विद्यार्थीनींनी अतिशय मेहनतीने कष्टाने हे यश संपादित केल आहे. यात अभिमानाची गोष्ट म्हणजे प्रियंका कांबळे जी स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करते, तिने स्वच्छतेचे काम आणि शाळा व अभ्यास तसेच प्रापंचिक जबाबदाऱ्या या सगळ्या गोष्टी सांभाळून दहावीच्या परीक्षेत ४७.६०% मिळवले आहे.

याबाबत प्रियंका कांबळे म्हणाल्या की लहान असताना त्यांना शिक्षण सोडून दिलं. तेव्हा शिक्षणाचे काय महत्त्व आहे हे कळलं नव्हतं. “म्हणतात ना शिक्षणाला कोणतंही वय नसतं आणि हीच बाब लक्षात घेता मी शिक्षण घ्यायचं विचार केल आणि श्रीमती रमाबाई रानडे प्रौढ स्त्री हायस्कूल येथे इयत्ता आठवीत शिक्षण घ्यायला सुरुवात केली.”

“मी महापालिकेत कात्रज परिसरात स्वच्छतेचे काम करत असते. हे काम करत मी माझे शिक्षण पूर्ण केले. सकाळी परिसरातील नागरिकांच्या घरी जाऊन कचरा गोळा करून मुलाला शाळेत सोडून मी माझ्या शाळेत शिक्षणासाठी जात होते. दहावीच्या परीक्षेला देखील मी कामावर जाऊन परीक्षेला जात होते आणि या काळात मला माझ्या आईने मदत केली,” यावेळी कांबळे यांनी सांगितले.

त्या पुढे म्हणाल्या की आयुष्यात एखादी गोष्ट अशी घडते ज्याने खूप काही बदलून जातं तशीच परिस्थिती त्यांच्याबाबत देखील घडली. “माझं आणि माझ्या नवऱ्याच भांडण झालं आणि आम्ही वेगळं राहू लागलो. मी थोडे दिवस माझ्या आईकडे राहिला आले आणि मग मुलाला घेऊन वेगळ राहिला गेले. आपल्याला काहीतरी केल पाहिजे हा विचार मला नेहेमी येत होता- आपल्याला पुढे जायचं असेल तर शिक्षण घ्यावं लागेल- हीच बाब लक्षात घेत मी शिक्षण घ्यायच विचार केला आणि शिक्षण घ्यायला सुरुवात केली. आज दहावीचा निकाल लागल्यानंतर मला खूपच आनंद होत आहे.”

अनेक वर्षांच्या शैक्षणिक गॅप नंतर पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात सामिल होऊन आज अनेक लोक हे शिक्षण घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे. असे असताना पुण्यातील प्रियंका कांबळे हिने मिळवलेल्या यशाच्या बाबत तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

याबाबत शाळेच्या मुख्याध्यापिका नीलम खोमणे म्हणाल्या की श्रीमती रमाबाई रानडे प्रौढ स्त्रियांचे हायस्कूल ही पुण्यात मध्यवस्तीत भरणारी शाळा आहे. या शाळेत प्रौढ महिलांना शिक्षण दिले जाते. २० व्या शतकात स्त्रियांच्या शिक्षणासाठी झटणाऱ्या शिक्षणव्रती श्रीमती रमाबाई रानडे यांनी शिक्षणापासून वंचित असलेल्या स्त्रियांसाठी २ ऑक्टोबर १९०९ रोजी पुणे सेवासदन ह्या संस्थेची स्थापना केली. आणि तेव्हापासून प्रौढ स्त्री शिक्षणाचे हे कार्य निरलसपणे चालू आहे. २०२२ साली प्रौढ माध्यमिक शाळा म्हणून ह्या शाखेला सरकारी मान्यता मिळून ५० वर्षे पूर्ण झाली आहे. पण प्रौढ स्त्रियांना साक्षर करण्याचे आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी सक्षम करण्याचे हे कार्य अगदी सुरुवातीच्या काळापासून म्हणजे सेवासदन संस्थेच्या स्थापने पासून ते आजपर्यंत चालू आहे. आणि चालू राहील. शिक्षणाची संधी न मिळालेल्या किंवा अर्ध्यावर शिक्षण सुटलेल्या अनेक मुली, महिला श्रीमती रमाबाई रानडे प्रौढ स्त्री हायस्कुल मध्ये शासनमान्य अभ्यासक्रमानुसार शिक्षण घेऊ शकतात.

खोमणे यांनी सांगितले की, “इथे इयत्ता पाचवी – सहावी एकत्र व इयत्ता सातवी – आठवी एकत्र असा अभ्यास घेतला जातो. इयत्ता नववी व दहावीचे स्वतंत्र वर्ग घेतले जातात. त्यामुळे विद्यार्थिनींची दोन वर्षे वाचतात. इयत्ता दहावीची परीक्षा दिल्यावर आमच्या विद्यार्थिनी विविध अभ्यासक्रम, व्यावसायिक शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभ्या राहत आहेत. सांगायला आनंद आणि अभिमान वाटतो की आमच्या प्रशालेचा या वर्षीचा दहावीचा निकाल हा चांगला लागला आहे.”