July 27, 2024

गांधर्व महाविद्यालय मंडळाला विद्यापीठ दर्जा मिळावा; मंडळाचे कुलसचिव प्रा. विश्वास जाधव यांची मागणी

पुणे, दि. १७ जून, २०२३ : कलाक्षेत्रात दीड लाख विद्यार्थी घडवणाऱ्या अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाला विद्यापीठ दर्जा प्राप्त व्हावा, अशी अपेक्षा मंडळाचे कुलसचिव प्रा. विश्वास जाधव यांनी व्यक्त केली. मंडळाचे कित्येक दशकांचे कलाक्षेत्रातील योगदान लक्षात घेता आणि नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात कला विषयाला दिलेले महत्त्व पाहता मंडळाचे कार्य भविष्यात महत्त्वपूर्ण ठरेल, असेही प्रा. जाधव म्हणाले.

कलाश्री संगीत मंडळ व द औंध सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भारतरत्न पं. भीमसेन जोशी संगीत महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. औंध येथील भारतरत्न भीमसेन जोशी कलामंदिर येथे सदर महोत्सव संपन्न होत आहे. यावेळी ‘कलाश्री संगीत मंडळा’च्या वतीने देण्यात येणारा यावर्षीचा ‘भारतरत्न पं. भीमसेन जोशी पुरस्कार प्रा. विश्वास जाधव यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. ११ हजार रुपये रोख,  मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप होते. याप्रसंगी आमदार सिद्धार्थ शिरोळे, महोत्सवाचे आयोजक अभिजीत गायकवाड, पं. सुधाकर चव्हाण, आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांच्यासह गांधर्व महाविद्यालयाचे अध्यक्ष पं बाळासाहेब सूर्यवंशी व मंडळाचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.

‘कलाश्री संगीत मंडळा’तर्फे १६ ते १८ जून दरम्यान भारतरत्न पं. भीमसेन जोशी संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचे हे १० वे वर्ष असून यावर्षी अभिजित गायकवाड यांचे विशेष सहकार्य महोत्सवाला लाभले आहे. औंध येथील पं भीमसेन जोशी कलामंदिर येथे हा महोत्सव संपन्न होत असून महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे.

पुरस्कार वितरण सोहळ्यात विशेष अतिथी म्हणून उपस्थित असलेले आमदार सिद्धार्थ शिरोळे म्हणाले, ‘संगीत ही ऊर्जा, चैतन्य आणि समरसता निर्माण करणारी कला आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत कलाक्षेत्राने सामाजिक समरसता घडवून राष्ट्रनिर्माणाचे कार्य केले आहे.” आकाश थिटे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.