December 14, 2024

भक्ती-शक्ती चौकात गॅस टँकर उलटला; सावधानतेसाठी निगडी परिसरात वीजपुरवठा बंद

पुणे, दि. २५ जून २०२३: निगडीमधील भक्ती-शक्ती चौकात एलपीजी गॅसचा टँकर उलटल्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी रविवारी (दि. २५) पहाटे निगडी गावठाण व परिसरातील वीजपुरवठा बंद करण्यात आला होता व सायकांळी ५ वाजता पूर्ववत करण्यात आला.

 

याबाबत माहिती अशी की, निगडीमधील कै. मधुकरराव पवळे पुलाजवळ मुंबईवरून पुण्याच्या दिशेने जाणारा भारत पेट्रोलियमचा एलपीजी गॅस टँकरला पहाटे अपघात झाला व उलटला. टँकरमध्ये गॅस असल्याने संभाव्य धोका टाळण्यासाठी पोलीस विभागाकडून महावितरणला वीजपुरवठा बंद करण्याबाबत कळविण्यात आले. त्यानुसार महावितरणकडून निगडी गावठाण, सेक्टर २४ व २६ तसेच साईनाथनगर परिसरातील सुमारे ५५० ग्राहकांचा वीजपुरवठा तातडीने बंद करण्यात आला. त्यानंतर सकाळी १०.३० वाजता सेक्टर २६ मधील वीजपुरवठा सुरु करण्यात आला. मात्र पोलीस विभागाच्या सूचनेनुसार उर्वरित परिसरात वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला व सायंकाळी ५ वाजता पूर्ववत करण्यात आला.