December 2, 2023

पुणे मेट्रोकडून ‘एक पुणे विद्यर्थी पास’ कार्डची विद्यर्थ्यांना भेट

पुणे, ०५/१०/२०२३: पुणे मेट्रोने १२ ऑगस्ट २०२३ रोजी ‘एक पुणे कार्ड’ या पुणे मेट्रोच्या बहुउद्देशीय कार्डचे लोकार्पण केंद्रीय मंत्री मा. श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते केले होते. उद्या दिनांक ६ ऑक्टोबर २०२३ रोजी पुणे मेट्रो विद्यार्थ्यांसाठी “एक पुणे विद्यर्थी पास” या मेट्रो कार्डचे लोकार्पण करणार आहे.

“एक पुणे विद्यर्थी पास” ची वैशिष्ठे पुढीलप्रमाणे:

पुणे मेट्रोतून दैनंदिन प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रीपेड “एक पुणे विद्यर्थी पास” ची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. यासाठी HDFC बँकेसोबत भागीदारी केली आहे. कार्डचे नाव “एक पुणे विद्यर्थी पास” असे आहे आणि ते भारतीय पेमेंट (RuPay) योजनेवर आधारित आहे. भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, “एक पुणे कार्ड” नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) च्या नियमांचे पालन करते.

“एक पुणे विद्यर्थी पास” हे बहुउद्देशीय कार्ड आहे आणि ते मेट्रोच्या प्रवासाबरोबरच भारतात कुठेही रिटेल पेमेंटसाठी वापरले जाऊ शकते. “एक पुणे विद्यर्थी पास” देशातील नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) च्या नियमांचे पालन करते त्यामुळे भारतातील इतर कोणत्याही मेट्रो आणि बस सेवांमध्ये वापरले जाऊ शकते. हे एक स्पर्श विरहित (कॉन्टॅक्टलेस) कार्ड आहे आणि त्यामुळे पेमेंट जलद होते. “एक पुणे विद्यर्थी पास” सर्व मेट्रो स्थानकांवर उपलब्ध आहे.

“एक पुणे विद्यर्थी पास” कार्ड घेण्यासाठी १३ वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे, त्याखालील वय असणारे विद्यर्थी हे कार्ड घेऊ शकत नाहीत. १३ ते १८ वर्षे वय असणारे विद्यार्थी पॅन कार्ड नसल्यास एक ई-फॉर्म भरून आपले “एक पुणे विद्यर्थी पास” कार्ड प्राप्त करू शकतात. यासाठी आधार कार्डच्या शेवटच्या चार क्रमांकाची आवश्यकता असेल. हे “एक पुणे विद्यर्थी पास” कार्ड घेण्यासाठी महाविद्यालयाचे अधिकृत ओळखपत्र किंवा चालू शैक्षणिक वर्षाचे बोनाफाईड प्रमाणपत्र आवश्यक असेल. हे कार्ड घेणाऱ्या प्रत्येक विद्यर्थ्याला तिकीट दरामध्ये ३०% सवलत लागू करण्यात आली आहे. या कार्डची वैधता ३ वर्षे असून हे कार्ड अहस्तांतरणीय आहे.

या कार्डची बाकी रचना आणि हे कार्ड प्राप्त करण्याची प्रकिया “एक पुणे कार्ड” प्रमाणे आहे. हे कार्ड सर्व मेट्रो स्थानकांवर उपलब्ध आहे. प्रवासी पुणे मेट्रोच्या संकेत स्थळावर उपलब्ध ई-फॉर्म भरून “एक पुणे विद्यर्थी पास” प्राप्त करू शकतात. या कार्डमध्ये पैसे भरण्यासाठी आपण कोणत्याही ई-वॉलेट, पुणे मेट्रो स्थानकात येऊन किंवा एक पुणे कार्ड संकेतस्थळावरून ऑनलाईन (२००० रु.पर्यंत) अश्या पद्धतीचा वापर करु शकतो. या कार्डद्वारे कोणतेही २००० रुपयांपर्यंतचे व्यवहार सहज करता येऊ शकतात. या कार्डला दिवसाच्या २० व्यवहारांची मर्यादा देण्यात आली आहे. या प्रसंगी पुणे मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्री. श्रावण हर्डीकर म्हणाले की, “पुणे, ज्याला पूर्वेचे ऑक्सफर्ड म्हणून संबोधले जाते, त्याला समृद्ध शैक्षणिक वारसा लाभला आहे, हे शहर देशाच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थ्यांना आकर्षित करते. “एक पुणे विद्यार्थी पास” चा शुभारंभ हे एक महत्त्वाचे पाऊल आहे, ज्याचा उद्देश विद्यार्थ्यांचा प्रवास केवळ किफायतशीरच नाही तर सुरक्षित, आरामदायी आणि जलद बनवण्याद्वारे त्यांना त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास किंवा वाचवलेल्या प्रवासाच्या वेळेसह छंद जोपासण्यास सक्षम बनवण्याचा आहे. हे कार्ड फक्त एक प्रवास साधनापेक्षा अधिक आहे; हे विद्यार्थ्याचा सर्वोत्तम साथीदार आहे”

पहिल्या १०,००० विद्यार्थ्यांना “एक पुणे विद्यर्थी पास” हे मोफत दिले जाणार आहे. त्यानंतर कार्डची किंमत १५० रुपये आणि वार्षिक शुल्क ७५ रुपये असे असेल.