पुणे, १७ मार्च २०२६ : देशसेवेचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. अग्नीवीर भरती प्रक्रियेअंतर्गत ऑनलाईन नोंदणीला सुरुवात झाली असून इच्छुक उमेदवारांना आता अर्ज करण्याची संधी खुली झाली आहे. विशेष म्हणजे या भरतीसाठी तयारी करणाऱ्यांसाठी मार्गदर्शन व प्रशिक्षणाचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
पुणे ARO तर्फे अग्नीवीर भरतीसाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया १३ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू झाली असून ती १ एप्रिल २०२६ पर्यंत सुरू राहणार आहे. या भरतीसाठी पुणे, बीड, लातूर, धाराशिव, अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यांतील उमेदवार पात्र ठरणार असून (झेडआरओ) पुणे यांनी यासंदर्भात अधिकृत अधिसूचना जारी केली आहे.
नोटिफिकेशननुसार, अग्नीवीर भरतीची लेखी परीक्षा अंदाजे १ जून ते १५ जून २०२६ दरम्यान होणार आहे. त्यानंतर पात्र उमेदवारांची मैदानी चाचणी व वैद्यकीय तपासणी घेण्यात येणार आहे.
दरम्यान, या भरतीत यश मिळविण्यासाठी महाराष्ट्र शासन अंगीकृत माजी सैनिक महामंडळ (मेस्को) संचलित ‘मेस्को करिअर अकॅडमी’, सातारा येथे विशेष प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. येथे सैनिक जीडी, क्लार्क, स्टोअर किपर, नर्सिंग असिस्टंट आणि टेक्निकल या विविध संवर्गांसाठी अनुभवी प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली लेखी व मैदानी परीक्षेची तयारी करून घेतली जाते.
प्रशिक्षणार्थ्यांसाठी माफक शुल्कात राहण्याची व जेवणाची सुविधा उपलब्ध असल्यामुळे ग्रामीण भागातील उमेदवारांनाही या प्रशिक्षणाचा मोठा लाभ होऊ शकतो.
इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी मेस्को करिअर अकॅडमी, टी.सी.पी.सी. आवार, कारंजे नाका, सातारा येथे संपर्क साधावा किंवा ९१६८९८६८६४ / ७४१५८४८०१३ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) सतेश दैवानराव हंगे यांनी केले आहे.

More Stories
नॅशनल डिफेन्स अकॅडमी परिसरात ‘अर्बन फॉरेस्ट’ची निर्मिती
Pune: साहसी प्रशिक्षण घेतलेल्या माजी सैनिकांनी माहिती देणेबाबत
पुणे: सैनिक कल्याण विभाग येथे कारगिल विजय दिवसाचे आयोजन