May 20, 2024

पुण्यात होणार भव्य पॉटरी फेस्टिव्हलचे आयोजन

पुणे, दि. २५ ऑक्टोबर, २०२३:मातीपासून बनविलेल्या कलात्मक वस्तू, दागिने, शिल्पे, भित्तीचित्रे यांसोबतच मातकाम करणाऱ्या कलाकारांशी संवाद साधत ही कला जवळून अनुभविण्याची संधी पुणेकरांना अनुभविता येणार आहे. निमित्त आहे पुण्यातील इंद्रनील गरई यांच्या आयजीए गॅलेरियाच्या वतीने आणि भूमी पॉटरी यांच्या विशेष सहकार्याने आयोजित करण्यात येणाऱ्या पुण्यातील ‘मेगा पॉटर्स फेस्टिव्हल’चे.

सदर महोत्सवाचे हे तिसरे वर्ष असून येत्या शुक्रवार दि.२७ ते २९ ऑक्टोबर, २०२३ दरम्यान सेनापती बापट रस्त्यावरील पॅव्हेलियन या ठिकाणी सकाळी ११ ते रात्री ९ दरम्यान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुला असेल याची कृपया नोंद घ्यावी.

याबद्दल अधिक माहिती देताना इंद्रनील गरई म्हणाले, “देशातील महत्त्वाचा महोत्सव म्हणून हा पुणे पॉटर्स मार्केट ओळखले जाते. महोत्सवाच्या या दुसऱ्या टप्प्यात सहभागी होत असलेले २४ पॉटर्स हे विशेष आकर्षण असणार असून यामध्ये प्रामुख्याने स्टुडीओ पॉटर्स आणि आपल्या कलेला हाताने मूर्त रूप देणारे कलाकार यांचा सहभाग असेल. दैनंदिन जीवनात उपयोगी पडणाऱ्या, वापरात येणाऱ्या मातीच्या वस्तू, सिरॅमिकमध्ये बनविलेली शिल्पे, भित्तिचित्रे, दागिने आणि विशेष कलाकृती यांचा सहभाग महोत्सवात असेल. यामध्ये पुण्यासोबतच मुंबई, रायगड, मेहसाना, बंगळूरू, गोवा, कलकत्ता, अहमदनगर या भागातील कलाकार सहभागी होणार आहेत.”

मातकाम ही सर्वात जुनी आणि गेली कित्येक शतके मानवाला अवगत असलेली कला असून सर्व वयोगटातील नागरिकांसाठी मातकलेच्या खास संवादात्मक कार्यक्रमाचे व मातीच्या भांडयाचे रंगकाम करणाऱ्या कार्यशाळेचे आयोजन या पुण्यातील महोत्सवात करण्यात आले असल्याची माहितीही गरई यांनी दिली.