December 2, 2023

पुणे विमानतळावर मानवी बाँम्ब; अफवा पसरविणाऱ्या ज्येष्ठ महिलेवर गुन्हा

पुणे, ०४/०८/२०२३: विमानतळावर मानवी बाँम्बची अफवा पसरविणाऱ्या एका ज्येष्ठ महिलेविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत केंद्रीय ओैद्योगिक सुरक्षा दलातील जवान दिपाली झावरे (वय ३३) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी एका ज्येष्ठ महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या महिलेचे वय ७२ वर्ष असून ती मूळची गुरुग्राम येथील आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेली महिला लोहगाव विमानतळावरुन दिल्लीला निघाली होती. लोहगाव विमानतळावरील प्रवासी तपासणी कक्षात केंद्रीय ओैद्योगिक सुरक्षा दलातील जवान झावरे नियुक्तीस होत्या. प्रवाशांची तपासणी करण्याचे काम त्यांच्याकडे होते.

त्यावेळी ‘मेरे चारो तरफ बम लगा है’, अशी धमकी ज्येष्ठ महिलेने दिली. झावरे यांनी त्वरीत बंदोबस्तावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती दिली. ज्येष्ठ महिलेची तपासणी करण्यात आली. तेव्हा तिच्याकडे बाँबसदृश वस्तू आढळून आली नाही. अफवा पसरविल्याप्रकरणी ज्येष्ठ महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक करपे तपास करत आहेत.