February 27, 2024

भारतीय विद्यार्थ्यांनी जपानमधील शैक्षणिक संधींचा लाभ घ्यावा – तोशिहीरो कनेको

पुणे, दि. २७ नोव्हेंबर, २०२३ : भारत आणि जपान या दोन देशांच्या संस्कृतीमध्ये अनेक समान धागे असून दोन्ही देशांचे मैत्रीपूर्ण संबंध हे किमान १५०० वर्ष जुने आहेत. बौद्ध धर्म असो किंवा पारंपारिक देवी देवतांची पूजा भारत जपान संबंध हे खूप जुने आणि कायमच सलोख्याचे राहिले आहेत. आज शिक्षणासाठी जगभरातून तब्बल २ लाख ३० हजार विद्यार्थी जपानमध्ये शिकायला येतात यात भारतीय विद्यार्थांची संख्या ही मागील वर्षी केवळ १५०० होती. भारत – जपान या दोन्ही देशांचे सांस्कृतिक व व्यापारी संबंध बघता भारतीय विद्यार्थ्यांनी जपान मधील उच्च शिक्षणाच्या संधीचा लाभ घ्यावा असे मत कॉन्सुलेट जनरल ऑफ जपान इन मुंबईचे डेप्युटी चीफ – मिशन्स, तोशिहीरो कनेको यांनी व्यक्त केले.

मुंबई मधील कॉन्स्युलेट जनरल ऑफ जपान, इंडो जपान बिझिनेस काउंसिल (आयजेबीसी) यांच्या वतीने आणि नवी दिल्ली येथील जपान फाउंडेशन व एमआयटी विश्वशांती विद्यापीठ (एमआयटी- डब्लूपीयु) यांच्या विशेष सहकार्याने पुण्यातील एमआयटी विश्वशांती विद्यापीठ येथे नुकतेच दुसऱ्या भारत जपान शैक्षणिक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत केलेल्या भाषणात कनेको बोलत होते.

एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ रविकुमार चिटणीस, आयजेबीसीचे सह-संस्थापक आणि अध्यक्ष सिद्धार्थ देशमुख, एमआयटी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ लिबरल आर्टसचे अधिष्ठाता प्रो. संतोष कुमार, सह अधिष्ठाता डॉ. प्रीती जोशी, जपान फाउंडेशनचे महासंचालक कोजी सातो, फिडेलटेक सॉफ्टवेअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील कुलकर्णी, जेएनयुच्या स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीजच्या जपानी विभागाच्या साब्रनी रॉय चौधुरी, आयआयटी दिल्लीचे सुजित सिन्हा, आयजेबीसीच्या उच्च शिक्षण आणि संशोधन समितीचे अध्यक्ष सुधीर जैस्वाल, एमआयटी इंटरनॅशनल कोलॅबोरेशन विभागाच्या सहाय्यक संचालिका निरुपमा कोचेरलाकोटा आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

भारतीय विद्यार्थी हे जर्मनी, इटली, फ्रांस येथे शिकायला जातात. त्या त्या ठिकाणची भाषा ते आत्मसात करतात मात्र जपानी भाषा शिकण्याकडे त्यांचा तितकासा कल नाही. नजीकच्या भविष्यात जपान आणि भारत दोन्ही देशांना त्यांच्या धोरणात्मक भागीदारीचा भाग म्हणून आर्थिक गुंतवणुकीवर काम करताना मोठा प्रमणात मनुष्यबळ लागणार आहे. यासाठी जपानमध्ये असलेल्या शैक्षणिक आणि करिअरच्या संधी लक्षात घेत भारतीय विद्यार्थ्यांनी प्राधान्याने जपान मधील संधींचा विचार करायला हवा असे कनेको म्हणाले.

जपानमधील शिक्षण हे अमेरिका व युरोपियन देशातील शिक्षणाच्या दृष्टीने १:१० इतक्या मोठ्या प्रमाणात स्वस्त आहे. तसेच जपान मध्ये राहणे देखील अमेरिका व युरोपीअन देशांच्या तुलनेत अतिशय स्वस्त आहे. शिवाय जपानची समृद्ध संस्कृती, येथील सुंदर निसर्ग, वैविध्यपूर्ण खाद्यसंस्कृती आणि विद्यार्थ्यांसाठी गरजेचे असलेले सुरक्षित वातावरण या सर्व बाबींचा विचार करीत भारतीय विद्यार्थ्यांनी जपान मधील शैक्षणिक संधींचा फायदा करून घ्यावा, असे आवाहन देखील कनेको यांनी केले. पुढील ५ वर्षात विविध प्रकल्पांच्या माध्यमातून जपान भारतात तब्बल ५ अब्ज येन (जपानी चलन) इतकी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणार असून याद्वारेही करिअरच्या मोठा संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती कनेको यांनी दिली.

भारत – जपान या दोन देशांमधील आत्मीयता वाढीस लागून जपानी भाषेचे प्रशिक्षण, जपानी संस्कृती विषयी जागरूकता, जपानमधील शैक्षणिक- व्यवसायिक संधी आणि करियर यांची माहिती महाविद्यालय स्तरावरच विद्यार्थ्यांना व्हावी या दृष्टीने जपान सहाय्यता केंद्र पुण्यातील कोथरूड येथील एमआयटी विश्वशांती विद्यापीठाच्या आवारात सुरु होणार असून या केंद्राचे औपचारिक उद्घाटन सदर परिषदेत करण्यात आले. एमआयटी, कोथरूड येथे सुरु होत असलेल्या जपान सहाय्यता केंद्राद्वारे जपानमधील शिक्षणाच्या संधी, करिअर, जपानी संस्कृतीविषयी जागरूकता आणि ज्ञान महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी उपलब्ध होऊ शकणार असून यामध्ये जपानी भाषेचे प्रशिक्षण, या संबंधीत कार्यशाळा, दोन्ही देशांतील विद्यापीठांत सहयोग करार आणि स्टुडंट एक्स्चेंज अर्थात विद्यार्थी देवाण घेवाण उपक्रम यांसारखे कार्यक्रम राबविण्यात येतील, अशी माहिती डॉ रविकुमार चिटणीस यांनी यावेळी दिली. सदर जपान सहाय्यता केंद्र पुढील वर्षापासून कार्यान्वित होईल.

भारतीय विद्यार्थ्यांना जपानमधील शिक्षण क्षेत्रातील संधी ओळखण्यास मदत व्हावी, या उद्देशाने सदर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या शैक्षणिक परिषदेत भारतीय विद्यार्थी, संशोधक आणि शिक्षणतज्ज्ञांना जपानमधील संधींची माहिती घेतली. याशिवाय दोन्ही देशांतील विद्यापीठांनी संशोधन आणि विकासासाठी एकमेकांना मदत करणे, ह्युमॅनिटीज (मानव्यविद्या), कला, संस्कृती, अर्थशास्त्र, व्यवस्थापन क्षेत्र, विज्ञान व तंत्रज्ञान आदी विषयांमधील शैक्षणिक उत्कृष्टतेला प्रोत्साहन देणे हे या परिषदेचे उद्देश होते. टोकियो विद्यापीठ, आशिया पॅसिफिक विद्यापीठ (एपीयू), जपान आंतरराष्ट्रीय विद्यापीठ (आययूजे), कान्साई विद्यापीठ, शिमेने विद्यापीठ अशा जपानमधील सर्वोत्तम विद्यापीठांचे प्रतिनिधी या परिषदेत सहभागी झाले होते.

जपानमधील शिक्षण आणि करिअर, विविध स्तरावरील भारत-जपान भागीदारीची गतिशीलता, तेथील संशोधन आणि शिष्यवृत्ती यांच्या संधी, प्रवेश प्रक्रिया, अभियांत्रिकी संशोधनात भारत जपान सहयोग आदी विषयांवर या परिषदेदरम्यान आयआयटी दिल्ली, क्योटो विद्यापीठ, क्युशू विद्यापीठ, जेएनयू आदी प्रतिथयश शैक्षणिक संस्थांच्या प्रतिनिधीं देखील आपले विचार मांडले. परिषदेचे प्रास्ताविक डॉ रविकुमार चिटणीस यांनी केले, अभिषेक चौधुरी यांनी आभार मानले आणि आशिष कसबे यांनी सूत्रसंचालन केले.