October 13, 2026

नदीकाठी जाण्यासाठी १७ कोटी मोजावे लागणार

पुणे, ६ आॅक्टोबर २०२६ : शेकडो कोटी रुपये खर्च करून मुळा-मुठा नदीकाठ सुधार प्रकल्प पूर्ण केला आहे. पण या नदीकाठी जाण्यासाठी नागरिकांना रस्ताच नसल्याने त्याचा वापरत करता येत नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आता महापालिका प्रशासनाने संगमवाडी ते बंडगार्डन पुलादरम्यान प्रकल्पाच्या ठिकाणी जाण्यासाठी ३८ हजार ५४२ चौरस मीटर खासगी जागा भूसंपादन करण्यासाठी स्थायी समितीपुढे प्रस्ताव ठेवला आहे.

नदीकाठच्या विकासांतर्गत या क्षेत्रात हरित पट्टा, उद्याने, जॉगिंग ट्रॅक, खुली व्यायामशाळा, खाद्यपदार्थ केंद्र आणि वाहनतळ उभारण्याचे नियोजन आहे. संगमवाडी येथील बाधित स्मशानभूमीचे स्थलांतर आणि मुळा-मुठा संगमाजवळ भव्य ‘कॉनफ्लुएन्स घाट’ विकसित करण्यासाठी ही जागा तांत्रिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची आहे. मात्र, जागामालक कागदपत्रे व मोजणीसाठी सहकार्य करत नसल्याने ताबा मिळवण्याच्या प्रक्रियेत अडचणी निर्माण झाल्या आहेत. यामुळे प्रकल्पातील महत्त्वाची कामे रखडण्याची चिन्हे आहेत.

प्रशासनाने व्यक्त केलेल्या भीतीनुसार, ही जागा ताब्यात न आल्यास नदीकाठावर राडारोडा आणि कचरा टाकण्याचे प्रकार वाढू शकतात. तसेच या परिसरात अनधिकृत बांधकामे, मंगल कार्यालये व हॉटेल उभारली जाण्याची शक्यता आहे. यामुळे नदी प्रदूषणाचा धोका वाढून नियोजित सार्वजनिक सुविधांच्या कामांना मोठा अडथळा येऊ शकतो. ही गंभीर बाब लक्षात घेऊन प्रशासनाने वाटाघाटींऐवजी थेट भूसंपादनाचा मार्ग स्वीकारला आहे.

२०२५-२६ च्या रेडीरेकनरनुसार सुमारे १७ कोटी ३० लाख रुपये मूल्य असलेल्या या ३८ हजार ५४२ चौ.मी. खासगी जागेचे भूसंपादन करण्यासाठी महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियमाच्या (एमआरआरटी) कलम १२६(२) अन्वये प्रक्रिया सुरू करण्याचा प्रस्ताव आयुक्त नवल किशोर राम यांनी स्थायी समितीत सादर केला आहे. प्रशासनाच्या या आक्रमक पवित्र्यामुळे रखडलेल्या नदी सुधार प्रकल्पाच्या कामाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.