पुणे, ६ आॅक्टोबर २०२६: पुणे ग्रँड टूरच्या पार्श्वभूमीवर शहरातील सुमारे १३६ किलोमीटरच्या मार्गावरील रस्ते चकाचक करण्याची तयारी महापालिकेने सुरू केली आहे. या मार्गावर पाणीपुरवठा, ड्रेनेज, एमएनजीएल, महावितरण, आय-ट्रिपल-सी, पोलिसांचे सीसीटीव्ही यांसह विविध यंत्रणांकडून सुरू असलेली खोदाईची कामे ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी दिले आहेत. त्यानंतर रस्त्यांच्या कामांना सुरुवात करण्यात येणार असून, खोदाईची परवानगी मागणाऱ्या संबंधित यंत्रणांना कामे मुदतीत पूर्ण करण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानंतर कोणत्याही सेवा वाहिनीसाठी पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेच्या मार्गिकेवर खोदकामास परवानगी दिली जाणार नसल्याचे पावसकर यांनी सांगितले.
पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धा जानेवारी २०२७ मध्ये होणार आहे. या स्पर्धेच्या अनुषंगाने शहर अभियंता यांच्या अध्यक्षतेखाली अतिरिक्त पोलीस आयुक्त (वाहतूक विभाग, पुणे शहर) मनोज पाटील, महापालिकेचे मुख्य अभियंता (पथ) राजेश बनकर तसेच विविध खात्यांचे प्रमुख आणि संबंधित आस्थापनांच्या अधिकार्यांची बैठक मुख्य इमारतीत झाली. या बैठकीत स्पर्धेच्या मार्गिकेवरील रस्ते आंतरराष्ट्रीय मानकांनुसार तयार करण्याबाबत संबंधितांना सूचना देण्यात आल्या. सायकल स्पर्धेच्या मार्गिकेवर विविध सेवा वाहिन्यांसाठी सुरू असलेल्या खोदकामांचा आढावा घेण्यात आला. यामध्ये एमएनजीएल, एमएसडीसीएल, दिनेश इंजिनिअरिंग, सीसीटीव्ही अॅलाइड कंपनी तसेच महापालिकेच्या पाणीपुरवठा, ड्रेनेज आणि विद्युत विभागाच्या कामांचा समावेश आहे.
चौकट
चारही पॅकेजची कामे सुरू
ग्रँड टूरसाठी चार पॅकेजमध्ये सुमारे १३६ किलोमीटरच्या रस्त्यांची कामे चार टप्प्यात करण्यात येणार आहेत. यातील काही रस्ते नव्याने तर ५२ किमीच्या रस्ते दुरुस्त करण्यात येणार आहेत. चारही पॅकेजची कामे सुरू झाली आहे. यामध्ये रस्त्यांचे पुनर्डांबरीकरण, चेंबरची पातळी रस्त्याशी समांतर करणे, पदपथांची दुरुस्ती, आवश्यक ठिकाणी नवीन पदपथ, तुटलेल्या दुभाजकांची दुरुस्ती आणि रंगकामाचा समावेश आहे. भिंतींचे रंगकाम, सुशोभीकरण आणि लँडस्केपिंगची कामेही केली जाणार आहेत.
गतिरोधक हटविणार; स्पर्धेनंतर लगेच बसविणार
सायकलपटूंना सलग आणि गुळगुळीत पृष्ठभाग मिळावा यासाठी स्पर्धेच्या मार्गावरील गतिरोधक आणि उंचावलेले पादचारी मार्ग तात्पुरते हटविण्यात येणार आहेत. सुमारे २०० ते २२५ गतिरोधक हटविण्यात येणार असून स्पर्धा झाल्यावर अपघाताचा धोका टाळण्यासाठी ते तातडीने पुन्हा बसविण्यात येणार आहे.
चांगल्या दर्जाचे रस्ते तयार करण्यासाठी ‘व्हीजी-४०’ उच्च दर्जाच्या डांबराचा वापर
रस्त्यांच्या कामासाठी पूर्वी विचारात घेतलेल्या व्हीजी-३० ऐवजी यंदा व्हीजी-४० ग्रेडचे डांबर वापरण्यात येणार आहे. त्यामुळे कामाची गुणवत्ता आणि टिकाऊपणा वाढेल, असे पावसकर यांनी सांगितले. रस्त्यांचे आयुष्य टिकविण्यासाठी पाण्याचा योग्य निचरा आणि वारंवार होणारी खोदाई टाळणे महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.

More Stories
पुणे: भोरमध्ये ट्रकने दुचाकीला 300 मीटरपर्यंत फरफटत नेले; दोन्ही वाहनांना आग, एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
लक्ष्मीपूजनानिमित्त ८ नोव्हेंबर रोजी पुणे मेट्रोची सेवा रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहणार
पुणे: मोहम्मदवाडीतील खासगी जागेवर कचरा टाकून जाळला जात असल्याचा आरोप; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर