February 27, 2024

माझ्यासाठी नाटकांची परिभाषा वेगळी – पद्मश्री वामन केंद्रे

पुणे, दि. २६ नोव्हेंबर, २०२३: नाटक हे केवळ मनोरंजनासाठी आहे, असे मला वाटत नाही. हास्य हा नवरंगांपैकी एक असला तरीही माझी नाटकाची परिभाषा काहीशी वेगळी असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध नाट्यकर्मी, नाट्यगुरू पद्मश्री वामन केंद्रे यांनी केले. ज्या नाटकाचा विषय रसिकांच्या सोबत कायम राहतो, पुसल्या जात नाही ते खरे नाटक असे मला वाटते, असेही केंद्रे म्हणाले.

पुण्यातील दखनी अदब फाउंडेशनच्या वतीने एकाहून एक सरस कविता, गझल्स, मुलाखती, चर्चासत्रे, नाटक आणि सांगीतिक कार्यक्रम यांची रेलचेल असलेल्या चौथ्या दोन दिवसीय डेक्कन लिटरेचर फेस्टिव्हलच्या दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात पद्मश्री वामन केंद्रे बोलत होते.

जंगली महाराज रस्त्यावरील बालगंधर्व रंगमंदिर येथे संपन्न होत असलेल्या या महोत्सवास यावेळी महोत्सवाच्या मुख्य समन्वयिका  मोनिका सिंग,  शाहीर सुरेश कुमार वैराळवर, सलीम आरिफ, फाउंडेशनचे जयराम कुलकर्णी, मनोज ठाकूर, रवी तोमर, युवराज शाह आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी आयोजित ‘प्रा. वामन केंद्रे- एक व्रतस्थ समर्पित रंगकर्मी’ या मुलाखतपर कार्यक्रमात लेखिका मृण्मयी भजक यांनी पद्मश्री वामन केंद्रे यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना केंद्रे म्हणाले, “एक नाटककार म्हणून मी केलेले नाटक हे कायम रसिकांच्या लक्षात राहील असेच असायला हवे असे मला कायम वाटते. आणि म्हणूनच प्रत्येक नाटक करताना मी संशोधनासाठी वेळ घेतला, तालमींना वेळ दिला आणि जे केलं ते मनापासून केले. मला नाटक करताना कोणत्याच गोष्टीची घाई नव्हती. त्यामुळे योग्य वेळ देऊनच मी माझे काम केले.”

नाटक हेच माझे जगणे आहे असे सांगत ते पुढे म्हणाले, “मी स्वत:ला रंगभूमीचा मुलगा मानतो. रंगभूमी हाच माझा श्वास आहे. मुंबईत आल्यावर अनेक माध्यमांची प्रलोभने माझ्या समोर होती मात्र नाटक सोडून ते करण्याचा मोह मी कायमच टाळला. घरात वारकरी परंपरा असल्याने लोककला रक्तातच होती. तो संस्कार मनावर होत होता. आज जो काही आहे तो त्यामुळेच. आजही गावाशी असलेली नाळ मी जपतो, आणि पुढच्या पिढीलाही ते करायला लावतो.”

दलित चळवळीमध्ये काम करत असताना अनेक प्रसंगांमधून यानंतर मूल्याधिष्ठित राजकारण होणार नाही हे माझ्या लक्षात आले. व्यक्तीनिष्ठीत राजकारणात माझ्यासारखी संवेदनशील व्यक्ती गेंड्याची  कातडी पांघरून जगू शकणार नाही, हे समजल्यावर मी नाटकाकडे वळालो, असे सांगत केंद्रे म्हणाले, “एनएसडीमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी मी एक वर्ष तयारी केली. सुरुवातीचे काही महिने तेथील आधुनिक वातावरणाचे दडपण माझ्यावर आले होते. मात्र सौजन्यशील, सृजनशील कलाकार घडायचा असेल तर अशा संस्थांमध्ये मोकळे वातावरण गरजेचे आहे हे लक्षात आल्यावर ते दडपण कमी झाले. पुढे मातीही जुळलेले आणि मातीतून जन्मलेले नाटक करण्यावर मी कायम भर दिला.”

जगभरातून येणारे कलाकार, कलाकृती पाहण्याच्या संधी मला दिल्लीत उपलब्ध झाल्या. त्या तीन वर्षांत प्रत्येक क्षणनक्षण मी हावरटा सारखा फक्त शिकण्यासाठी घालवला, अशा आठवणी केंद्रे यांनी सांगितल्या.

आपल्याकडे अनेकांना मराठीचे वावडे असते. अनेक जण केवळ इंग्रजी वर्तमानपत्रे वाचतात त्यामुळे अनेक नाटके मी इंग्रजी भाषेत केली. त्याला रसिकांनी डोक्यावर घेतले देशभरात या नाटकांचे इंग्रजी प्रयोग झाले. जोगते- जोगतीण, नटरंग, तमाशा हे विषय नाटकांच्या माध्यमातून मी देशभर पोहोचविले, असेही केंद्रे यांनी नमूद केले.

मी एका शैलीत गुंतून राहील, अशी काळजी अनेक दिग्गज कलाकारांनी व्यक्त केली. मात्र एका शैलीत गुंतून न राहता नाटकाची अनेक रूपे करून बघण्याचे मी ठरवले आणि तसे करतही राहिलो. असे सांगत केंद्रे म्हणाले की, “कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन जी व्यक्ती जगू इच्छित नाही अशी व्यक्ती दुर्दैवी आहे असे मला वाटते. म्हणून माझ्या मते कोणत्याही कलात्मक संस्थांमध्ये नकारात्मक विचारांच्या लोकांना जागा नसावी.” दिग्दर्शन, नाटक करणे, अध्ययन, आयोजन हे सर्वच माझ्या जवळचे आहे या सर्वांमध्ये मी रमतो. ज्या गोष्टीत मन रमतं ती गोष्ट उत्तमच होते असेही केंद्रे म्हणाले. आर जे बंड्या यांनी महोत्सवातील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.