पुणे, दि. ७ जून २०२३: महापारेषण कंपनीच्या ४०० केव्ही क्षमतेच्या लोणीकंद ते कराड या अतिउच्चदाब वीजवाहिनीमध्ये बुधवारी (दि. ७) सकाळच्या सुमारास तांत्रिक बिघाड झाल्यामुळे उरुळी कांचन, वाघोली, पेरणे आदी भागांमध्ये सकाळी ९.३० वाजेपासून दिवसभर प्रत्येकी दीड तासांचे चक्राकार पद्धतीने विजेचे तात्पुरते भारनियमन करावे लागले.
याबाबत माहिती अशी की, कोयना टप्पा ४ मधून निर्माण होणाऱ्या विजेचे कराड ते लोणीकंद ४०० केव्ही अतिउच्चदाब वीजवाहिनीद्वारे पारेषण होते. मात्र आज सकाळच्या सुमारास या वीजवाहिनीमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे पुणे परिमंडल अंतर्गत पुरवठा होणाऱ्या सुमारे ५० ते ६० मेगावॅट विजेचे पारेषण ठप्प झाले. परिणामी ही विजेची तूट भरून काढण्यासाठी नाईलाजास्तव उरळीकांचन, वाघोली, केसनंद, पेरणे, सरतापवाडी, कोरेगाव मूळ, वाडेबोल्हाई, आष्टापूर, नायगाव आदी गावे व परिसरामध्ये सकाळी ९.३० वाजेपासून दिवसभर प्रत्येकी दीड तासांचे चक्राकार पद्धतीने विजेचे तात्पुरते भारनियमन करावे लागले. सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत महापारेषणच्या वीजवाहिनीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण होणार आहे. त्यानंतर या सर्व गावांतील तात्पुरते भारनियमन मागे घेण्यात येणार आहे

More Stories
मुळशी पॅटर्न-२ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; युवा उद्योजक पुनीत बालन आणि अभिजीत भोसले यांची घोषणा
सारसबाग बंद ठेवण्यावरून पुन्हा वाद; गेल्या वर्षी धार्मिक कारण, यंदा सुरक्षेचा मुद्दा
Pune: एनसीईआरटीच्या पुस्तकात मराठा साम्राज्याच्या नकाशाचा पुन्हा समावेश व्हावा या मागणीसाठी भव्य मोर्चा