September 24, 2026

गणेश विसर्जनासाठी महापालिका सज्ज

पुणे, २४ सप्टेंबर २०२६ : गणेशोत्सवाच्या सांगतेच्या पार्श्वभूमीवर गणेश विसर्जनासाठी पुणे महापालिकेने शहरात व्यापक तयारी केली आहे. १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत ३८ विसर्जन घाट, ५८ विसर्जन हौद, ३०५ ठिकाणी ८१२ लोखंडी टाक्या, २२४ मूर्ती संकलन केंद्रे उभारण्यात आली आहेत. विसर्जन घाटांवर सीसीटीव्हीची नजर असून स्वच्छतेसह विविध नागरी सेवांसाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ आणि वाहने तैनात करण्यात आली आहेत.

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले की, विसर्जनासाठी १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत व्यवस्था करण्यात आली असून गर्दीचा विचार करून अतिरिक्त सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी जवळच्या विसर्जन हौद किंवा टाक्यांचा वापर करावा, तसेच गणेश मंडळांनी मिरवणुकीच्या निर्धारित वेळेचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

शहरात ५८ विसर्जन हौदांसह ३०५ ठिकाणी ८१२ लोखंडी विसर्जन टाक्या ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे नदीवरील घाटांवरील गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे. गणेशमूर्ती स्वीकारण्यासाठी २२४ संकलन केंद्रे सुरू करण्यात आली असून शाडू मातीच्या मूर्ती व शाडू माती संकलनासाठी ४५ केंद्रांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.

घाटांवर सीसीटीव्हीची नजर

विसर्जनाच्या ठिकाणी गर्दीचे व्यवस्थापन आणि सुरक्षिततेसाठी सर्व विसर्जन घाटांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे अनुचित प्रकार घडल्यास त्याची तातडीने दखल घेणे शक्य होणार आहे. निर्माल्य संकलनासाठी शहरातील २६७ ठिकाणी ३५८ निर्माल्य कलश आणि कंटेनर ठेवण्यात आले आहेत.

विसर्जन मिरवणुकीदरम्यान शहरातील स्वच्छता व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी १६ वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, १६१ आरोग्य निरीक्षक, २९२ मुकादम आणि ४,१७९ कायमस्वरूपी स्वच्छता कर्मचाऱ्यांसह अन्य महापालिका कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. विविध कामांसाठी १,६७० वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

वाघोलीतील खाणीत पुनर्विसर्जन

महापालिकेच्या मूर्ती संकलन केंद्रांवर जमा होणाऱ्या गणेशमूर्तींचे वाघोली येथील खाणीत पुनर्विसर्जन करण्यात येणार आहे. त्यामुळे संकलित मूर्तींची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्याची व्यवस्था महापालिकेने केली आहे.

विसर्जनाच्या दिवशी शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिक आणि गणेश मंडळांनी शांतता व शिस्त राखून मिरवणुकीचे वेळापत्रक पाळावे आणि महापालिका तसेच पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त राम यांनी केले आहे.