September 24, 2026

विसर्जन मिरवणुकी हरित रथ, विष्णू रथ, महाकाली रथ ठरणार पुणेकरांचे आकर्षण

पुणे, २४ सप्टेंबर २०२६: पुणेकरांसह अवघ्या राज्यातील भाविकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या गणेशोत्सव मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीसाठी मानाच्या गणपती मंडळांसह प्रमुख मंडळांनी खास तयारी केली आहे. मानाच्या गणेशोत्सव मंडळांचे “हरित रथ’, “महाकाली रथ’, “विष्णू रथ’ या स्वरुपाचे देखावे, आकर्षक सजावट ही यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत भाविकांसाठी प्रमुख आकर्षण ठरणार आहे. तर, डोंगरीच्या कारागृहातून सुटका झाल्यानंतर लोकमान्य टिळक व आगरकर यांचे महात्मा फुले यांनी केलेले भव्य स्वागत हा जिवंत देखावा भाविकांना मिरवणुकीत पहायला मिळणार आहे.

* “हरित रथा’द्वारे द्वारे कसबा गणपती मंडळ देणार पर्यावरण संवर्धनाचा संदेश
मानाचा पहिला गणपती कसबा गणपती मंडळाच्या श्रींची मिरवणुक पारंपरिक रजत पालखीतून निघणार आहे. शिस्तबद्ध व पारंपरिक मिरवणुकीसाठी ओळखल्या जाणाऱ्या कसबा गणेशोत्सव मंडळाकडून यंदाच्या मिरवणुकीत पर्यावरणपुरक “हरित रथा’द्वारे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणार आहे. मिरवणुकीत रजत पालखी, नगारा व चौघाडा वादन, ढोल-ताशा पथके, विविध दिंड्यांचा सहभाग असणार आहे. त्याचबरोबर नशामुक्तीचा संदेशही दिला जाणार आहे. विशेषतः प्रभात ब्रॉस बॅंड यंदाही आपली अनेक वर्षांची सेवा कायम ठेवणार आहे. महात्मा फुले मंडई येथील लोकमान्य टिळक पुतळ्यापासून सकाळी ९.३० वाजता मिरवणुकीला सुरुवात होणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांनी दिली.

* तांबडी जोगेश्‍वर गणपती मंडळाकडून पारंपरिक पद्धतीने निघणार मिरवणूक
मानाचा दुसरा गणपती श्री तांबडी जोगेश्‍वरी गणेशोत्सव मंडळ दरवर्षीप्रमाणे यंदा देखील पारंपरिक पद्धतीने सकाळी ९.४५ वाजता मुख्य विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार आहे. अब्दागिरी, मानचिन्हांसह श्री गणराय चांदीच्या पालखीमध्ये विराजमान होणार आहेत. मिरवणुकीच्या प्रारंभी सतीश आढाव यांचे नगारावादन, त्यापाठोपाठ न्यू गंधर्व ब्रॉस बॅंड, विघ्नहर्ता व शिवमुद्रा ढोल-ताशा पथकांचा समावेश तसेच पारंपरिक वेशभुषेतील महिला व पुरुषांचा सहभाग हे मिरवणुकीचे वैशिष्ट्ये असणार आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी यांनी दिली.

* गुरुजी तालीम मंडळाकडून मिरवणुकीसाठी “माता महाकाली’ रथ
पारंपरिक मिरवणुकीसाठी ओळखल्या जाणाऱ्या मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम मंडळाकडून यंदाही विसर्जन मिरवणुक पारंपरिक पद्धतीने काढली जाणार आहे. मंडळाने यंदा मिरवणुकीसाठी खास “माता महाकाली’ हा फुलांचा आकर्षक रथ तयार केला आहे. स्वप्नील व सुभाष सरपाले यांनी फुलांचा रथ तयार केला आहे. मंडळाच्या विसर्जन मिरवणूकीत जयंत नगरकर यांचे नगारावादन, अश्वराज ब्रास बॅंड, नादब्रह्म ढोल ताशा पथक, गर्जना ढोल ताशा पथक, शिवगर्जना ढोल ताशा पथक अशा ढोलताशा पथकांचे वादन होणार आहे. सकाळी साडे नऊ वाजता लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यापासून मिरवणुकीस सुरुवात होईल. तर, नियोजित वेळेनुसार विसर्जन होणार असल्याची माहिती मंडळाचे पदाधिकारी राजु परदेशी यांनी माहिती दिली.

* श्री तुळशीबाग मंडळाच्या गणरायासाठी खास “विष्णु रथ’
मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणेशोत्सव मंडळाकडून विसर्जन मिरवणुकीची भव्य परंपरा यंदा “विष्णू रथा’द्वारे कायम राखली जाणार आहे. १६ फूट रूंद व ३२ फुट लांब उंच रथावर विष्णूची दहा फुट उंचीची मूर्ती असणार आहे. हायड्रोलिक पद्धतीने मूर्तीची उंची कमी-जास्त होणार आहे. विशेषतः कमळाच्या फुलात विराजमान झालेली गणरायाची मूर्ती असणार आहे. त्यासमोर स्वागतासाठी जलपरी असणार आहे. त्याचबरोबर गाय, हत्ती, नाग आणि मत्स्याची आकर्षक परदेशी फुलांमधील रचना केल्या जाणार आहेत. सरपाले बंधू यांच्याकडून त्यासाठीची खास तयारी करण्यात आली आहे. मिरवणुकीत लोणकर बंधूंचे नगारावादन, स्वरूपवर्धनी, गजलक्ष्मी, शिवमुद्रा ही पथके सहभागी होणार आहेत. परंपरेनुसार महात्मा फुले मंडई येथून लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यास हार अर्पण करुन सकाळी साडे नऊ वाजता मिरवणुकीस सुरुवात होणार असल्याची माहिती मंडळाचे कोषाध्यक्ष नितीन पंडीत यांनी दिली.

* केसरीवाडा गणपती मिरवणुकीत महात्मा फुले यांच्यावर जिवंत देखावा
महात्मा फुले मंडई येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सकाळी साडे दहा वाजता मानाचा पाचवा केसरीवाडा गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. मिरवणुकीच्या प्रारंभी बिडवे बंधूंचा सनई चौघडा असणार आहे. त्यामागे इतिहास प्रेमी मंडळातर्फे महात्मा फुले यांच्या जन्मद्विशताब्दी वर्षानिमित्त जिवंत देखावा दाखविला जाणार आहे. लोकमान्य टिळक व गोपाळ गणेश आगरकर यांची डोंगरीच्या कारागृहातून सुटका झाली, त्यानंतर महात्मा फुले यांनी टिळक-आगरकर यांचे स्वागत केले, त्या प्रसंगावर आधारीत हा जिवंत देखावा असेल. मिरवणुकीत श्रीराम शिवमुद्रा, अभेद्य ढोल ताशा पथकांचा समावेश असेल. “सुजलाम सुफलाम’ हा रथ असणार आहे. प्रथेप्रमाणे फुलांनी सजविलेल्या पालखीत केसरीवाडा गणेशोत्सव मंडळाची श्री गणेशाची मूर्ती विराजमान असेल.

प्रमुख मंडळे विसर्जन मिरवणुक रथ

* अखिल मंडई मंडळाचा “कोणार्क सुर्य मंदिर रथ’
अखिल मंडई मंडळाकडून यंदा विसर्जन मिरणुकीसाठी खास “कोणार्क सुर्य मंदिर रथ’ साकारण्यात आला आहे. कोणार्क सूर्य मंदिराच्या वास्तुशैलीवर आधारीत ३२ फुट उंचीचा रथ असून त्यावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्यावर ऐश्वर्याचे प्रतीक हत्ती, शौर्याचे प्रतीक सिंह यांच्या प्रतिकृती रथावर असणार आहे. गणपतीच्या मागे तेजाचे प्रतीक सूर्य साकारण्यात आला आहे. मिरवणुकीत वाद्यवृंद, वाद्यपथके, नगरावादन, न्यू ब्रॉस बॅंड व विविध पथकांचे वादन होणार आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांनी दिली.

* श्रीमंत दगडुशेठ मंडळाकडून “श्री वक्रतुंड रथ’
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीने यंदाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी खास “श्री वक्रतुंड रथ’ तयार करण्यात आला आहे. शुक्रवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी दुपारी चार वाजता बेलबाग चौकातुन विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे .यंदाची प्रतिकृती असलेल्या वृंदावनमधील प्रेम मंदिराच्या विषयाप्रमाणे सांगता मिरवणूकीसाठी देखील “श्री वक्रतुंड रथ’ तयार केला आहे. रथावर आठ नक्षीदार स्तंभ असतील. त्यातील चार स्तंभावर भगवान विष्णू व भगवान कुबेर यांच्या प्रतिमा साकारण्यात आल्या आहेत. शिखर भागात घुमट व जाळीदार नक्षीकाम असणार आहे, त्यावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. याबरोबरच अमली मुक्त भारत अभियानही असणार आहेस अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने व कोषाध्यक्ष महेश सुर्यवंशी यांनी दिली.

* हुतात्मा बाबू गेनू मंडळाचा अंबामाता मंदिर रथ
हुतात्मा बाबू गेनू मंडळाकडून यंदाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी गुजरातमधील “अंबामाता मंदिर रथ’ साकारण्यात आला आहे. हुबेहुब साकारण्यात आलेले हे मंदिर तब्बल २८ फुट उंच असणार आहे. तर २० फुटावर हा मंदिर हायड्रोलिक पद्धतीने खाली-वर करता येणार आहे. मंदिरावर आकर्षक फुले व विद्युत रोषणाई असणार आहे. मिरवणुकीमध्ये गजलक्ष्मी, अभेद्य व रुद्रगर्जना या वाद्य पथकांचा समावेश असणार आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी दिली.

* श्रीमंत भाऊ रंगारी गणपती
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाकडून दरवर्षीप्रमाणे यंदाही पारंपरिक पद्धतीने विसर्जन मिरवणुकीलर भर देण्यात आला आहे.