December 2, 2023

महिला सक्षमीकरणासाठी दीर्घकालीन उपाययोजनांची गरज – मीनाक्षी शेषाद्री

पुणे, दि. २५ सप्टेंबर, २०२३ : निर्भयासारख्या घटनांमुळे समाजमन ढवळून निघत असताना महिला सक्षमीकरणासाठी तात्पुरत्या नव्हे तर जलद, सखोल आणि दीर्घकालीन उपाययोजना गरजेच्या आहेत असे परखड मत सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री यांनी मांडले. महिषासुराचा संहार करण्यासाठी ज्यापद्धतीने देवी आपल्या हातात शस्त्र धारण करते, त्याचप्रकारे रोटरीच्या बिबवेवाडी क्लबद्वारे गेली चार वर्षे राबविण्यात येत असलेला ‘अस्मिता’ उपक्रम समाजातील सर्व स्तरांतील मुलींना शारीरिक व मानसिक छेडछाडीच्या घटनांना प्रतिकार करण्यासाठी धैर्य, माहिती आणि प्रतिकार करण्याचे पाठबळ पुरवीत आहे असेही शेषाद्री म्हणाल्या.

रोटरीच्या बिबवेवाडी क्लबद्वारे जागतिक कन्या दिनाचे औचित्य साधत कोरेगाव पार्क येथील ओ हॉटेल या ठिकाणी एका विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मीनाक्षी शेषाद्री प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. शेषाद्री यांच्या उपस्थितीत क्लबच्या ‘अस्मिता’ या कन्या सक्षमीकरण उपक्रमाच्या तिसऱ्या टप्पाची सुरुवातही करण्यात आली.

जीटीपीएल संस्थेच्या सीएसआर विभागाच्या संचालिका दिव्या मोमाया, सीएसआर प्रमुख हार्दिक संघवी, डिस्ट्रीक्ट ३१३१ च्या प्रांतपाल मंजू फडके, आहारतज्ज्ञ व टेड एक्स स्पीकर जीनल शाह आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. जीटीपीएलच्या दिव्या मोमाया, हार्दिक संघवी आणि सहकाऱ्यांना यावेळी व्होकेशनल सेवा पुरस्काराने गौरविण्यात आले.

केवळ लहानपणीच नाही तर अभिनेत्री म्हणून कार्यरत असताना घडलेल्या शारीरिक छेदछाडीच्या घटनांचा आपल्यावर दुरगामी परिणाम झाला, त्यामुळे काही काळ आत्मविश्वाला धक्का बसला मात्र अन्यायाविरोधात उभे ठाकण्याची हिंमत याच घटनांमुळे आली असे सांगत मीनाक्षी शेषाद्री म्हणाल्या की, “आपल्यावर अन्याय होत असताना कोणती प्रतिक्रिया द्यायची हेच आपल्याला त्या वेळी सुचत नाही. आपल्यासोबत काय घडत आहे हे समजायला वेळ जातो. मात्र शारीरिक अथवा मानसिक कोणत्याही प्रकारचा अन्याय सहन न करता त्याचा प्रतिकार करणे आजच्या काळात गरजेचे आहे. हा प्रतिकार कसा करावा याबद्दलचे ज्ञान, माहिती देऊन रोटरीसारख्या संस्था मुलींच्या सक्षमीकरणामध्ये मोलाचे कार्य करीत आहे. ‘अस्मिता’सारख्या उपक्रमाद्वारे जास्तीत जास्त महिला व मुली या स्वत:च्या प्रश्नांची उत्तरे स्वत: शोधायला आणि स्वत:ची मदत करायला प्रेरित होत आहेत, ही सकारात्मक बाब आहे. अशा उपक्रमांद्वारे समाजमन बदलायला मदत होणार आहे.”

माझ्या व्यावसायिक जडणघडणीत महाराष्ट्राचा वाटा मोठा आहे. महाराष्ट्राने मला भरभरून प्रेम दिले त्यासाठी मी कायम ऋणी असेल असेही शेषाद्री यावेळी म्हणाल्या.

‘अस्मिता’ या कन्या सक्षमीकरणाच्या उपक्रमाविषयी अधिक माहिती देताना रोटरी क्लब ऑफ बिबवेवाडीचे अध्यक्ष निखील भालेराव म्हणाले, “मागील ४ वर्षांपासून आमच्या क्लबच्या वतीने अस्मिता हा उपक्रम राबविला जात असून आजवर ५ राज्यात किमान २०० ठिकाणी ८० हजार विद्यार्थीनींपर्यंत पोहोचण्यात आम्हाला यश आले आहे. पुढील एका वर्षात हा आकडा १ लाख इतका असेल असा आमचा विश्वास आहे. अस्मिता उपक्रमाअंतर्गत तिसऱ्या टप्प्यात येत्या वर्षभराच्या काळात महाविद्यालयीन मुलींवर लक्ष केंद्रित करीत त्यांसाठी आर्थिक साक्षरता, मानसिक आरोग्य, तांत्रिक प्रवीणता आणि स्वसंरक्षणाद्वारे स्व-सक्षमीकरण अशा महत्त्वाच्या विषयांवर आधारीत कार्यशाळांचे आयोजन आम्ही करणार आहोत. या वेळी सहभागी विद्यार्थिनीं स्वसंरक्षणासाठी स्प्रे, शारीरिक स्वास्थ्यासाठी मल्टी-व्हिटॅमिनच्या गोळ्या, प्रबोधनात्मक पुस्तिका, संकटकाळात उपयोगी पडतील अशा शिट्ट्या देण्यात येतील.” या टप्प्याचे वैशिष्ट्य म्हणजे शिक्षणाचा अनुभव वाढविण्यासाठी तंत्रज्ञानाच्या एकत्रीकरणाद्वारे खास तयार केलेले व्हिडिओ प्रशिक्षणाला आणखी मदत करतील, असेही भालेराव यावेळी म्हणाले.

जीनल शाह यांनी यावेळी आहार कसा असावा, व्यस्त दिनक्रमात खाण्याच्या व व्यायामाच्या कोणत्या सवयी पाळायला हव्यात, आहारासंदर्भातील मिथ्ये आणि त्यांची सत्यता यांबद्दल माहिती देत उपस्थितांशी संवाद साधला.