October 1, 2023

पुणेकर न्यूज

पुणेकर न्यूज

“हर घर तिरंगा अभियान” अंतर्गत पुणे टपाल विभागा तर्फे भव्य बाईक रॅलीचे आयोजन

पुणे, 11 ऑगस्ट 2023: “हर घर तिरंगा 2.0” अभियाना अंतर्गत दि.13.08.2023 ते 15.08.2023 दरम्यान प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावरती तिरंगा फडकावून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला केलेले आहे. यासाठी भारतीय टपाल विभागाला जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत राष्ट्रध्वज पोहचवण्याचे महत्त्वाचे कार्य सोपवण्यात आले आहे.
या अभियानाचा एक भाग म्हणुन पुणे शहर पूर्व टपाल विभागा तर्फे जन जागृतीसाठी दि. 11.08.2023 रोजी बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले.

महात्मा गांधी रोड, पुणे कॅम्प येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून बाईक रॅलीची सुरुवात करण्यात आली. या बाईक रॅलीची सांगता पुणे प्रधान डाक कार्यालय (पुणे जी पी ओ) येथे करण्यात आली.
या बाईक रॅलीचे आयोजन डॉ.अभिजीत इचके, वरिष्ठ अधीक्षक, पुणे शहर पुर्व टपाल विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने टपाल विभागाचे कर्मचारी व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. सांगता समारंभास संबोधित करतांना अधीक्षकांनी प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावरती तिरंगा फडकावून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केले.