May 9, 2024

पुणे फ्लो हाफ मॅराथॉनचे ५ नोव्हेंबर रोजी आयोजन

पुणे, ता. २८ – महिला सक्षमीकरणासाठी व त्यांच्या प्रगतीसाठी सातत्याने काम करणाऱ्या फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI) फिक्की फ्लो च्या पुणे चॅप्टरतर्फे ६ व्या फिक्की फ्लो पुणे अर्धं मॅराथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या रविवार, ५ नोव्हेंबर रोजी ही मॅराथॉन होणार असून पुण्यातील मगरपट्टासिटी येथून या आंतरराष्ट्रीय हाफ मॅरेथॉन स्पर्धेची सुरवात होणार आहे. अशी माहिती फिक्की फ्लोच्या पुणे चॅप्टरच्या चेअरमन सौ. रेखा सतीश मगर यांनी दिली.
ही स्पर्धा सर्वांसाठी व खुली असून यासाठी नोंदणी आवश्यक असणार आहे. या स्पर्धेच्या आयोजनात मगरपट्टा सिटी ग्रुप, एचडीएफसी बँक, अॅमडॉक्स, तमिळनाडू मर्चंटाईल बँक, इटॉन, जेट सिंथेसिस, व्होल्टास, जेएलएल या व आदी कंपन्यांनी पाठबळ देवू केले आहे.

मॅराथॉनच्या आयोजनासंबंधी अधिक माहिती देताना सौ. रेखा मगर म्हणाल्या की, हा मॅराथॉनचा रूट एआयएमस सर्टिफाईड असून १० आणि २१ किलोमीटरच्या स्पर्धकांना त्यांच्या वेळेसंबंधीचे ई प्रमाणपत्र दिले जाणार आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धकांच्या सहभागासह २१ कि.मी., १० कि.मी., ०५ कि.मी., ०३ कि.मी., अशा टप्प्यांमध्ये स्पर्धकांना सहभागी होता येणार आहे. सर्व सहभागी स्पर्धकांना टी शर्ट, फिनिशर मेडल, रूट सपोर्ट दिला जाणार आहे.

या स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांच्या सक्षमीकरणावर भर दिला जाणार आहे. महिलांच्या प्रगतीसाठी विविध सामाजिक प्रकल्प राबवून जनजागृती करणे हा मॅरेथॉनचा उद्देश आहे. सजग पुणेकर पुरूष व महिलांनी www.ficciflopunemarathon.com या संकेतस्थळावर मोठ्या संख्येने नाव नोंदणी करून या मॅराथॉनमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन फिक्की फ्लो पुणे चॅप्टरने केले आहे. या स्पर्धेचा उद्देश लक्षात घेवून इटॉन, अॅमाडॉस, बीएनवाय मेलॉन, अॅक्सेंचर आदी कंपन्यांचे कर्मचारी मोठ्या संख्येने मॅराथॉनमध्ये सहभागी होत आहेत.
..
सारी रन होणार…
या स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांच्या सक्षमीकरणावर भर दिला जाणार आहे. त्या अनुषंगाने पुणे शहर व परिसरातील महिलांना सध्या सर्वत्र सुरू असलेल्या ट्रेंडप्रमाणे साडी परिधान करून देखील या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. या स्पर्धेत सारी रनसाठीची विशेष कॅटॅगरी असणार आहे.
..
फिक्की फ्लो विषयी –
FICCI हे आशियातील महिलांसाठीचे महत्त्वाचे व्यासपीठ आहे. फिक्की फ्लो च्या भारतभरात १९ शाखा आहेत. त्यापैकी पुण्यातील शाखेचे हे ९ वे वर्ष आहे. ही संस्था जवळपास ८ हजार महिला व्यावसायिक व उद्योजिकांचे प्रतिनिधित्व करते आहे. गेली ४० वर्षे ही संस्था महिलांमध्ये उद्योजकता व व्यावसायिक दृष्टीकोनात वाढ व्हावी यासाठी कार्यरत आहे. त्याकरिता संस्था सातत्याने वेगवेगळ्या कार्यशाळा, प्रशिक्षण, परिसंवाद व परिषदांचे आयोजन करते. फिक्की फ्लो चे पुणे चॅप्टर महिलांना उद्योगवाढीत मदत करण्याबरोबरच त्याच्यासाठी सुदृढ आणि लोकशाही पद्धतीचे वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने काम करणार आहोत. त्यातूनच त्याच्यांमध्ये कौशल्य विकास, नावीन्य, व्यावसायिक दृष्टीकोन निर्मिती होईल व त्यांचा उद्योगातील सहभाग वाढेल यासाठी प्रयत्नशील आहे.