September 17, 2024

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ट्राय – सर्व्हिस बँड डिस्प्ले कार्यक्रमाचे आयोजन

पुणे, १३/०९/२०२३: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि पुणे स्थित भारतीय लष्कराची राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एन.डी. ए . ) च्या स्थापनेला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या संस्थांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने गुरुवार दिनांक १५ सप्टेंबर २०२३ रोजी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर ४. ०० वाजता ट्राय – सर्व्हिस बँड डिस्प्ले कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

हा कार्यक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, एन.डी. ए . आणि कर्वे समाज संस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने होणार आहे.या कार्यक्रमास महाविद्यालयीन विद्यार्थी, पालक, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, विविध कंपन्यांचे प्रतिनिधी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी तसेच सरकारी अधिकारी – कर्मचारी आणि सर्वसामान्य नागरिक उपस्थित राहणार आहे.

राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती, राष्ट्राभिमान आणि राष्ट्रीय एकात्मता जागृत ठेवण्याच्या उद्धेशाने लष्कराच्या तिन्ही दलाच्या अतिशय महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या ट्राय – सर्व्हिस बँड डिस्प्लेचे आयोजन करण्यात आले आहे. एन.डी. ए . च्या इतिहासामध्ये अशा पद्धतीने आयोजित करण्यात आलेला हा आगळा वेगळा असा पहिलाच कार्यक्रम आहे.

“सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि भारतीय लष्कराची राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एन.डी. ए . ) या दोन्ही संस्था अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करीत असून यांच्या सहकार्याने राष्ट्रगौरवाचे सादरीकरण करण्याचा मान आम्हास मिळाला याचा सार्थ अभिमान आहे. विद्यापीठाच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने आयोजित या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती, राष्ट्राभिमान वृद्धिंगत होईल आणि यातून राष्ट्रीय एकात्मता जागृतीसाठीही मदत होईल.” – कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी