December 2, 2023

२८ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर दरम्यान ‘व्ह्रूम’ या व्हीआर फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन

पुणे, दि. २५ ऑक्टोबर, २०२३ : ग्योथं इन्स्टिट्यूट – मॅक्स म्युलर भवनतर्फे तंत्रज्ञान आणि कलेचा अनोखा मिलाफ साधणाऱ्या ‘व्ह्रूम’ या व्हीआर फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन येत्या शनिवार दि २८ ऑक्टोबर ते शुक्रवार दि. ३ नोव्हेंबर, २०२३ दरम्यान करण्यात आले आहे. सर्व दिवस सकाळी १० ते दुपारी २ आणि सायंकाळी ५ ते ९ या वेळेत एरंडवणे येथील द बेस या ठिकाणी सदर महोत्सव संपन्न होणार आहे. महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुला असून यासाठी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश देण्यात येईल. मात्र, महोत्सवात सहभागी होण्यासाठी आगाऊ नोंदणी आवश्यक आहे याची कृपया नोंद घ्यावी. यामध्ये व्हीआर या साधनाचा वापर करीत चित्रपट पाहण्याचा आनंद रसिक प्रेक्षकांना घेता येणार आहे हे विशेष.

पारंपारिक कथाकथना सोबतच व्हीआर अर्थात आभासी वास्तव या तंत्रज्ञानाचा प्रभावी आणि भविष्याचा वेध घेत केलेला वापर हे या संपूर्ण महोत्सवाचे वैशिष्ट्य असून महोत्सवा अंतर्गत जागतिक कीर्तीच्या दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेले तब्बल १५ चित्रपट पाहण्याची संधी रसिकांना उपलब्ध होणार आहे. हा चित्रपट महोत्सव जगभरातील नाविन्यपूर्ण चित्रपट निर्मात्यांच्या कामांची रसिकांना ओळख करून देईलच शिवाय पारंपारिक सीमांना आव्हान देत तंत्रज्ञानाद्वारे व्हर्च्युअल रिअॅलिटी आणि ३६० चित्रपट निर्मितीचा वापर कसा करायचे याबद्दलही माहिती देईल अशी माहिती आयोजकांनी कळविली आहे.

हे सर्व चित्रपट अनसर्टन टाईम्स, फ्रेश पर्स्पेक्टीव्ह, इमॅजिन्ड रिअॅलिटीज, मिसिंग पिक्चर्स या चार विभागांमध्ये दाखविण्यात येणार असून यामध्ये ‘चाईल्ड ऑफ एम्पायर’, ‘यु डिस्ट्रॉय, वी क्रिएट’, ‘किंड्रेड’, ‘दी चॉईस’, ‘मिडनाईट स्टोरी’, ‘रॉक पेपर सिझर्स’, ‘बर्डस ऑफ प्रे’, ‘दी सेव्हन स्टोरी बिल्डींग’ या चित्रपटांचा समावेश आहे. या महोत्सवात दाखविण्यात येणाऱ्या चित्रपटांमध्ये स्वातंत्र्य, प्रेरणादायी महिला, अॅनिमेशन-, डिजिटल मिडीयाने केलेले क्रांती, पारंपारिक २ डी आणि व्हीआर कथाकथनामधील अंतर असे वेगवेगळे विषय मांडण्यात आले आहेत.

महोत्सवात सहभागी होणायासाठी कृपया https://www.ticketkhidakee.com/vrfilmfestival या संकेतस्थळावर नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.