July 25, 2024

‘फ्रीमेसनरी’ या संघटनेबद्दल रहस्यमयता कमी करण्यासाठी ‘ओपन हाऊस’चे आयोजन

पुणे, दि. २३ मे, २०२३ : ‘फ्रीमेसनरी’ या संघटनेबद्दल अधिक माहिती जाणून घेण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. येत्या रविवार दि. २८ मे रोजी सकाळी १० ते सायं ५ दरम्यान कॅम्प परिसरात पुणे रेस कोर्स जवळील ६ ए एक्झिबिशन रस्त्यावरील फ्रीमेसनरी हॉलमध्ये हे ओपन हाऊस होणार असून यासाठी सर्वांना विनामूल्य प्रवेश देण्यात येणार आहे.

इंग्लंडच्या युनायटेड ग्रँड लॉजच्या अंतर्गत दी लेस्ली विल्सन लॉज नं ४४८० यांच्या वतीने सदर ओपन हाऊसचे आयोजन करण्यात आले असून फ्रीमेसनरी संघटने संदर्भात सकाळी १०.३०, दुपारी १ आणि ३.३० या वेळेत ओपन हाऊस दरम्यान उपस्थितांना संघटनेचे व्यवस्थापन व कामकाजा संदर्भात माहिती देण्यात येणार आहे.

या विषयी अधिक माहिती देताना डेप्युटी- डिस्ट्रीक्ट ग्रँड मास्टर असलेले देवेश हिंगोरानी म्हणाले, “फ्रीमेसनरी संघटनेबद्दल असलेली रहस्यमयता कमी करण्याच्या उद्देशाने आम्ही या ओपन हाऊसचे आयोजन केले असून या वेळी सामान्य नागरिकांना लॉजच्या परिसरात प्रत्यक्ष फेरफटका मारता येईल. इतकेच नाही तर फ्रीमेसनरी संघटना व ते वापरत असलेली सूचक चिन्हे व आजच्या काळातील त्यांचे संदर्भ या बद्दलही यावेळी माहिती देण्यात येईल.”

यासोबतच एका आरोग्य शिबिराचे आयोजन देखील करण्यात आले असून यामध्ये हिमोग्राम, एस क्रिएटनीन, एचबीए१सी, प्रोस्टेट स्पेसिफिक अँटीजेन (पीएसए) व इंटरनॅशनल प्रोस्टेट सिम्पटम्स स्कोअर (एमओयु१) यांसाठी आवश्यक रक्त चाचण्या करण्यात येतील, असेही हिंगोरानी यांनी सांगितले. याबरोबरच शहरातील सुप्रसिद्ध युरोलॉजिस्ट डॉ अमोल तलौलिकर आणि अॅलर्जिस्ट, इम्युनोलॉजिस्ट असलेले डॉ हिमांशू बापट हे देखील नागरिकांना आवश्यक तो सल्ला देण्यास उपलब्ध असणार आहेत. या शिबीराचा फायदा संघटनेतील सभासद व त्यांच्या कुटुंबासोबतच सामान्य नागरिकही घेऊ शकतील.

सदर आरोग्य शिबिरात होणाऱ्या तपासण्या या सभासद व त्यांच्या कुटुंबियांसाठी मोफत असून इतरांसाठी रु. १०० इतके नगण्य शुल्क आकारले जाणार असल्याचे हिंगोरानी यांनी कळविले आहे.

पुणे विभागासंदर्भात अधिक माहिती –
बॉम्बे प्रांताचे तत्कालीन गव्हर्नर एच. ई. सर लेस्ली ओर्मे विल्सन यांच्या प्रती आदर व्यक्त करण्यासाठी त्यांच्या नावे पुण्यातील लेस्ली विल्सन लॉजची उभारणी ही ३ नोव्हेंबर १९२६ रोजी करण्यात आली. अनेक मोठे उद्योजक, व्यवसायिक, व्यवस्थापकीय संचालक, चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व, डॉक्टर, वकील आणि उच्च दर्जावर कार्यरत अधिकारी,  व्यावसायिक यांचा या संघटनेमध्ये समावेश आहे. काही प्रसिद्ध भारतीय ‘फ्रीमेसन्स’मध्ये स्वामी विवेकानंद, पंडित मोतीलाल नेहरू, सर दोराबजी जमशेदजी टाटा, डॉ. सी. राजगोपालाचारी, सर सुलतान मोहम्मद शाह, आगा खान, महाराजा दुलीप सिंग यांचा समावेश होता.

फ्रीमेसनरी या संघटनेबद्दल –
चरित्रसंपन्न पुरुषांची जगातील सर्वांत जुनी संस्था म्हणून फ्रीमेसनरी ही संघटना ओळखली जाते. युनायटेड ग्रँड लॉज ऑफ इंग्लंड (UGLE)च्या नेतृत्वाखाली भारतांबरोबरच जगभरांतील बऱ्याच देशांत ही संस्था कार्यरत आहे.  इ. स. १७१७ मध्ये याची स्थापना झाली असून जगातील सर्वात जुने ग्रँड लॉज म्हणून ते ओळखले जाते. आज या लॉजच्या अंतर्गत जगभरातील तब्बल १० हजार लॉज कार्यरत असून जगभरात समुदायाचे ४ लाख सदस्य आहेत.