October 1, 2023

पुणेकर न्यूज

पुणेकर न्यूज

पुणे: 24 जणांची 13 कोटी 82 लाखांची फसवणूक; गुंतवणूकीवर आकर्षक परताव्याचे प्रलोभन

पुणे, २६/०५/२०२३: शेती फर्मच्या माध्यमातून गुंतवणूक केल्यास मोठा परतावा देण्याचे प्रलोभन दाखवत तब्बल 24 नागरिकांना 13 कोटी 82 लाख 87 हजार रुपयांचा आर्थिक गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. व्हर्टीकल फार्मिंगच्या माध्यमातून हळदीचे उत्पादन घेण्यासाठी प्रकल्प उभारणीसाठी गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने ही फसवणूक करण्यात आली आहे.

याप्रकरणी, चतुःश्रृंगी पोलिसांनी प्रशांत झाडे (रा. अंबरनाथ ठाणे), रोहन मताले, संदेश गणपत खामकर (रा. नाशिक), जयंत रामचंद्र बांदेकर (रा. वेस्ट मुंबई), कमलेश महादेवराव ओझे, ए.एस. अ‍ॅग्री अ‍ॅण्ड अक्वा एलएलपी या कंपनीतील इतर व्यक्ती यांच्या विरुद्ध महाराष्ट्र ठेवीदाराचे हितसंबंध अधिनियमानुसार फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका 63 वर्षीय व्यवसायिकाने फिर्याद दिली आहे. ही घटना फर्मचे बाणेर येथील कार्यालयत 2019 ते अद्यापर्यंतच्या कालावधीत घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मुळचे अकोला येथील असून, ते शेती व व्यापार करतात. फिर्यादींना सोशल मिडीयाच्या माध्यमातून आरोपीच्या एएस अ‍ॅग्री आणि अक्वा या फर्मची माहिती मिळाली होती. त्यांनी संकेतसथळाच्या माध्यमातून माहिती घेतली. त्यानंतर रोहन मताले याने कंपनीची व गुंतवणूकीच्या योजनांची माहिती दिली. फिर्यादी बाणेर येथील कंपनीच्या कार्यालयात गेले त्यावेळी मताले आणि बांदेकर यांनी पुन्हा फर्मच्या योजनांची माहिती देऊन प्रशांत झाडे याच्यासोबत बोलणे करून दिले. त्यावेली त्याने फिर्यादींनी गुंतवणूक करावी म्हणून आमची फर्म व्हर्टीकल फार्मिंगमध्ये जगात पहिल्या क्रमांकावर आहे. या तंत्रज्ञानाचे आमच्याकडे पेटंट आहे. शंभर एकराच जेवढे हळदीचे उत्पादन निघते तेवढे आम्ही एका एकरात काढतो. या योजनेत गुंतवणूकदाराने स्वतःची जमीन फर्मला प्रकल्प उभारण्यासाठी फर्मला द्यायची. त्यावर प्रकल्प उभारण्यासाठी स्वतःची रक्कम गुंतवायची. त्यानंतर त्या जमीनीवर फर्म व्हर्टीकल फारमिंगचे प्रकल्प उभारून हळदीचे उत्पादन घेणार. ते उत्पादन फर्म स्वतः खरेदी करणार. केलेल्या गुंतवणूकीवर फर्म दरमहा परतावा देईल. योजनेचा कालावधी सहा वर्षाचा राहील. रोख रकमेतील निव्वळ गुंतवणूक व प्रकल्पातील गुंतवणूक असे पर्याय दिले.फिर्यादी आरोपींच्या प्रलोभनाला बळी पडले. त्यांनी फर्ममध्ये एक कोटींची गुंतवणूक केली. काही दिवस त्यांना मोबदला दिला. मात्र त्यानंतर त्यांना न मोबदला दिला न त्यांच्या अकोला येथील जमीनवर कोणता व्हर्टीकल शेतीचा प्रकल्प उभा केला. जेव्हा फिर्यादींनी माहिती घेतली तेव्हा अशाचप्रकारे 23 जणांची फसवणूक केल्याचे त्यांना समजले. त्यांनी अनेकदा पैशाबाबत आरोपींकडे विचारणा केली. मात्र त्यांना वारंवार विविध कारणे सांगण्यात आली. त्यानंतर त्यांनी याबाबत पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासासाठी सायबर पोलिसांकडे वर्ग केला आहे.